पायाभूत चाचणीचा खर्च शाळेच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:12 AM2017-09-08T00:12:30+5:302017-09-08T00:13:09+5:30
जिल्हाभरात पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने शिक्षकांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढाव्या लागल्या. याचा खर्च शाळेच्या माथी बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरात पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने शिक्षकांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढाव्या लागल्या. याचा खर्च शाळेच्या माथी बसला आहे.
विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने दुसरी ते नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतली जाते. या चाचणीच्या प्रश्नपत्रिका महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात. परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या पायाभूत गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने सदर परीक्षा घेतली जाते. ७ सप्टेंबरपासून परीक्षेला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी मराठी विषयाची परीक्षा होती. टप्प्याटप्प्याने इंग्रजी, गणित विषयाचे पेपर होणार आहेत. जिल्हास्तरावर प्रत्येक विषयाच्या कमी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने प्रत्येक तालुक्याला २५० ते ३०० प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात वितरित करण्यात आल्या. गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने प्रत्येक शाळेची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन शाळांना कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका वितरित केल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्याांना झेरॉक्स काढून प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास शाळेला ५०० रूपयांचा खर्च येणार आहे. शाळेजवळ पुरेशा प्रमाणात निधी राहत नसल्याने सदर खर्च मुख्याध्यापक व शिक्षकांच्या खिशातून करावा लागला आहे. त्यामुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यू-डायसवर प्रत्येक विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. यू-डायसवरची आकडेवारी लक्षात घेऊन शिक्षण परिषदेकडे प्रश्नपत्रिकांची मागणी केली जाते. मात्र कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे जेवढे विद्यार्थी तेवढ्या प्रश्नपत्रिका असणे आवश्यक असतानाही कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मागील वर्षीही झाला होता कमी प्रमाणात पुरवठा
मागील वर्षी सुध्दा जिल्हाभरातील शाळांना कमी प्रमाणात प्रश्नपत्रिकांचा पुरवठा करण्यात आला होता. शाळांनी स्वत:च्या पैशातून प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढली होती. काही शाळांमध्ये २०० ते ३०० विद्यार्थी आहेत. पायाभूत चाचणीचे मराठी, गणित, इंग्रजी व विज्ञान हे पेपर होतात. झेरॉक्स काढून सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत करण्याचा खर्च हजारोंच्या घरात आहे. शाळेकडे तेवढा निधी राहत नाही. स्वत:च्या पैशातून खर्च भागविल्याशिवाय पर्याय शिल्लक नाही. दरवर्षी असेच चालू राहिल्यास या चाचणीबद्दलचा उत्साह कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वरिष्ठ स्तरावरूनच कमी प्रमाणात पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. त्यामुळे प्रत्येक शाळेची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन सर्व शाळांना प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील. या उद्देशाने प्रत्येक शाळेला कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत.
- संगीता खोब्रागडे,
गट शिक्षणाधिकारी, गडचिरोली
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
शिक्षण परिषदेने सुरूवातीला पायाभूत चाचणी पोळा सणाच्या कालावधीत घेण्याचे ठरविले होते. मात्र त्या कालावधीत सुट्या आल्या होत्या. त्यामुळे तारीख बदलविण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या परीक्षेला ९५ टक्के पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.