जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:34 AM2018-04-18T00:34:52+5:302018-04-18T00:34:52+5:30
अहेरी तालुक्यातील आलापल्ली या ठिकाणी माझ्या क्षेत्राचा आणि येथील लोकांचा विकास व्हावा यासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही मी देतो, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली या ठिकाणी माझ्या क्षेत्राचा आणि येथील लोकांचा विकास व्हावा यासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही मी देतो, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी केले.
आलापल्ली-नागेपल्लीसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ९.१३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मंगळवारी त्यांचा हस्ते झाले. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरी पंचायत सभापती सुरेखा आलाम, पंचायत समिती उपसभापती राकेश तलांडे, जिल्हा परिषद सदस्य सुनिता कुसनाके, पंचायत समिती सदस्य योगिता मोहुर्ले, आलापल्लीच्या सरपंच सुगंधा मडावी, आलापल्लीच्या उपसरपंच पुष्पा अलोणे, नागेपल्लीचे सरपंच सरोज दुर्गे, उपसरपंच मल्लरेडी येंकरवार, अशोक रापेल्लीवार आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
नागेपल्लीच्या पाणी पुरवठ्याची मागणी असताना गेल्या ३० वर्षांत यासाठी निधी देण्यात आला नाही आता तो उपलब्ध करून दिला आहे. चामोर्शी तालुक्यातील कुरूड, येनापूर या ठिकाणी सुध्दा पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध झाला आहे, असे आत्राम म्हणाले. अहेरीहून कुठेही जायचे असेल तर आल्लापल्लीहूनच जावे लागते त्यामुळे आलापल्लीचाही विकास व्हावा, अशी आपली भूमिका आहे. याचे पुढील पाऊल म्हणून आलापल्ली बसडेपोची मागणी देखील महिना भरात पूर्ण होईल, असे सुतोवाच पालकमंत्र्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, जि.प. उपाध्यक्ष यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व आभार मजीप्राच्या गडचिरोली येथील शाखा अभियंता आर. आर. बिष्णोई यांनी केले.
अशी आहे पाणी पुरवठा योजना
या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पूर्ण करणार आहे. याची एकूण अंदाजित किंमंत ९ कोटी १३ लक्ष ५१ हजार रुपये इतकी आहे. यातून आलापल्ली व नागेपल्ली, येथे मोठ्या टाक्या उभारणे, प्राणहिता नदीपासून जलवाहिनी व गावांतर्गत पुरवठ्यासाठीच्या जलवाहिनीचे काम होणार आहे.
आलापल्ली येथे बांधण्यात येणाºया टाकीची क्षमता ४.१० लक्ष लिटर तर नागेपल्ली येथील टाकी १.५५ लक्ष लिटर क्षमतेची असेल. दीर्घ नियोजनाचा भाग म्हणून सन २०३३ मधील नागेपल्ली आणि आलापल्लीची लोकसंख्या वृद्धी गृहीत धरून याची आखणी करण्यात आलेली आहे. पाण्याची मागणी दररोज १.२४ दशलक्ष लिटर गृहीत धरण्यात आली आहे. योजनेच्या कामात निरीक्षण विहीर, पुरवठा विहीर व पंपगृह तसेच पारंपारिक पद्धतने २.५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आदींचाही समावेश आहे. हि सर्व कामे १८ महिन्यात पूर्ण होणार आहेत.
भाषणावरून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
पालकमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना भाषण करू द्यावे, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी केली. यावरून भाजपा व आविस कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली. अजय कंकडालवार यांना भाषण करू द्या या मागणीसाठी आरडाओरड केला. यादरम्यान पोलीस विभागाने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समजावून वातावरण शांत केले. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भाषण केले.