स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:36 AM2021-04-01T04:36:43+5:302021-04-01T04:36:43+5:30
कुभरखेडा : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक ...
कुभरखेडा : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़; मात्र कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.
प्रभारी लाइनमनमुळे नागरिकांना त्रास
अहेरी : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाइमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. आता हिवाळा सुरू असला तरी दिवसामागे वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वीज सुरळीत करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी लाइनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
कोंडवाड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
आरमाेरी : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहेत; मात्र निधीअभावी कोंडवाड्यांची दुरवस्था झाल्याने जनावरांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. कोंडवाड्याची दुरुस्ती करणे अडचणीचे होत आहे.
रस्त्यावर कचरा टाकण्यास आळा घाला
गडचिराेली : शहरातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाॅर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे त्या तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. त्यामुळे नगर परिषदेने स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने वाॅर्डात पाठवावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शिंगाडा उत्पादनासाठी हवे अर्थसहाय्य
कुरखेडा : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात; परंतु या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांकडून हाेत आहे.
हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत
गडचिराेली : कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. दरम्यान, प्रशासनाने शिथिलता देत बाजारपेठ सुरू केली आहे. यामध्ये हॉटेलसुद्धा सुरू करण्यात आले आहे; मात्र पाहिजे तसे ग्राहकच फिरकत नसल्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. शहरात तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने हॉटेल्स आहेत.
पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक तसेच कॉम्प्लेक्समधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. रात्रीच्या सुमारास गेटमधून प्रवेश करून चाेरटे पेट्राेल लंपास करीत आहेत.
शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्या
एटापल्ली : केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत; मात्र या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचविली जात नाही़ परिणामी, पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास योग्य माहिती मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
कोचिंग संचालकांचे आर्थिक नुकसान
अहेरी : गावात ट्यूशन क्लास घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या बेरोजगार युवकांचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी येेऊन गेली तरीही शाळा सुरू झाल्या नाहीत, त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्यापही शिकवणी लावली नाही. परिणामी, गावातील बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षण दिले जात असले तरी काेचिंग संचालकांचे शुल्क देण्याबाबत विद्यार्थी व पालक उदासीन आहेत.
कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले
एटापल्ली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
सेवायोजन कार्यालय ठरतेय कुचकामी
गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखत पत्र पाठविण्यात येत होते; मात्र आता ऑनलाइन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगारी नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाही. त्यामुळे सेवायोजन कार्यालय कुचकामी ठरल्याचे दिसून येते.
सिरोंचा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
सिरोंचा : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. नगर पंचायतीने शहरात फवारणी करावी.
नागरिक उघड्यावरच जातात शौचास
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले; मात्र बांधलेल्या शौचालयाचा १०० टक्के वापर होताना दिसून येत नाही. अद्यापही ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. अनेक गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे, हे खरे; पण त्यांचा उपयोग होताना दिसत नाही.
चौक परिसरात स्वच्छतागृहे उभारा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी जागा नाही. काही नागरिक इंदिरा गांधी चौकात असलेल्या सभागृहात लघुशंका करतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे.
कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित
कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. कुरखेडा तालुक्यातील पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याची मागणी आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्षच हाेत असल्याचे दिसून येते.
व्यसनमुक्तीसाठी ग्रा. पं. नी पुढाकार घ्यावा
गडचिरोली : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने अनेक ठिकाणी कारवाई करून सुगंधित तंबाखूची विक्री करण्यावर पायबंद घातला. गावपातळीवर सुगंधीत तंबाखूबंदीसाठी ग्रा. पं. नी पुढाकार घेऊन ग्रामसेवकांना प्रवृत्त करावे, अशी मागणी होत आहे.
सुकन्या योजनेची जनजागृती करा
आष्टी : सुकन्या योजना अत्यंत चांगली आहे; मात्र या योजनेची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत सदर योजनेची माहिती अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेची जनजागृती होणे गरजेचे आहे.
वनहक्क प्रकरणे रखडली
अहेरी : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केल्या जाते; मात्र गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत.
आरमोरी मार्गावर गतिरोधक निर्माण करा
गडचिरोली : गडचिरोली- आरमोरी या मुख्य मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर शहरात बसथांबा, व्यावसायिक दुकाने व शाळा असल्याने येथून विद्यार्थी व नागरिकांचे आवागमन असते. त्यामुळे मार्गावर दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे. गतिराेधकाअभावी वाहनधारक सुसाट वाहने चालवित असल्याने अपघाताचा धाेका आहे.