लोकवर्गणीतून झाला अंत्यविधी
By admin | Published: January 6, 2016 01:52 AM2016-01-06T01:52:58+5:302016-01-06T01:52:58+5:30
अहेरी तालुक्याच्या राजाराम खांदला येथील मूळ रहिवासी असलेल्या साईबाबा पुंडलिक मोतकुलवार (४०) या वाहनचालकाचा आजाराने मृत्यू झाला.
वाहनचालक संघटनेचा पुढाकार : नागपूरच्या उपचाराचा खर्चही केला
एटापल्ली : अहेरी तालुक्याच्या राजाराम खांदला येथील मूळ रहिवासी असलेल्या साईबाबा पुंडलिक मोतकुलवार (४०) या वाहनचालकाचा आजाराने मृत्यू झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्यावर उपचाराचा संपूर्ण खर्च तसेच मृत्यूनंतर अंत्यसंस्काराचाही खर्च लोकवर्गणीतून उभा करण्यात आला. या कामासाठी वाहनचालक संघटना एटापल्लीने पुढाकार घेतला होता.
साईबाबा मोतकुलवार यांची आर्थिक परिस्थिती अंत्यत हलाखीची होती. अहेरी येथील राजाराम खांदला हे आपले मूळ गाव सोडून एटापल्ली येथे मागील वर्षापासून भाड्याची खोली घेऊन राहत होते. चरितार्थ चालविण्यासाठी ते खासगी गाड्या भाड्याने घेत. मागील तीन महिन्यांपासून आजारी अवस्थेत होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होता. उपचाराकरिताही वाहनचालक संघटनेने वर्गणी गोळा करून पैसे जमा केले होते. ४ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर लोकवर्गणीतूनच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा आप्त परिवार आहे. साईबाबाच्या मृत्यूने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. (तालुका प्रतिनिधी)