लोकवर्गणीतून महिलेवर अंत्यसंस्कार
By admin | Published: May 27, 2017 01:16 AM2017-05-27T01:16:00+5:302017-05-27T01:16:00+5:30
मागील काही वर्षांपासून अहेरी शहरात साधारण ६० वर्षे वयाची एक वेडसर महिला फिरत होती.
अहेरीतील मंडळांचे सहकार्य : वेडसर महिलेवर रितीरिवाजानुसार केले सोपस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : मागील काही वर्षांपासून अहेरी शहरात साधारण ६० वर्षे वयाची एक वेडसर महिला फिरत होती. कोणी तिला पोदाडी तर कोणी सोनाबाई असे म्हणत. या महिलेचा गुरूवारी सायंकाळी मृत्यू झाला. अहेरी येथील युवकांनी लोकवर्गणी गोळा करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
अहेरीत होणाऱ्या लग्नसमारंभात ती आवर्जून उपस्थित राहून वरातीत नाचायची. ही आजी कुठली, तिचे कोण नातेवाईक याची माहिती अहेरीतील कुणाकडेच नाही. इकडे तिकडे अन्न मागून ती कशीतरी जीवन जगत होती. मागील एका वर्षांपासून तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली व ती अंध झाली. नगर पंचायत परिसरातील मित्रपरिवार दररोज तिच्या जेवणाची, पाण्याची, चहाची व्यवस्था करीत होते. तिला वाटेल तेथे नेऊन सोडत होते.
प्रचंड उन्हाच्या तडाख्याने व वृद्धपाळाने गुरूवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान जुन्या एस.बी. महाविद्यालयाजवळ तिने अखेरचा श्वास घेतला. ही बाब हेल्पिंग हॅन्ड्स, एकता क्रीडा मंडळ, नगर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माहीत झाली. याची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. गुरूवारी तिचा मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शुक्रवारी डॉ.संजय उमाटे यांनी स्वत: अगदी पहाटेच तिचे शवविच्छेदन आटोपुन या आजीचा मृतदेह हेल्पिंग हॅन्ड्स व एकता क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविला. या आजीचे कोणीच नातेवाईक नसल्याने अहेरीकरांनीच वाजा, फटाके व इतर सन्मानजनक विधी करून सन्मानाने सोनाबाईचा अंत्यविधी शुक्रवारी सकाळी ९ वाजता पार पडला. यासाठी लागणारा खर्च हेल्पिंग हॅन्ड्स, एकता क्रीडा मंडळ, नगर मित्र मंडळातर्फे करण्यात आला. अंत्यविधीला नगरसेवक श्रीनिवास चटारे, सचिन पेदापल्लीवार, श्रीनिवास वीरगोनवार, मनोज मेडपल्लीवार, शंकर मगडीवार, रवी नेलकुद्री, उमेश गुप्ता, बबलू गुप्ता, बंडू गुरूनुले, संतोष येमुलवार, महेश बेझंकीवार, संतोष बेझंकीवार, पप्पू मद्दीवार, प्रतीक मुधोळकर, इस्ताक शेख, अमोल गुडेल्लीवार, शफी पठाण, नितीन जंगावार, गणेश डोके, अशोक चांदेकर, श्रीनिवास मगडीवार, दीपक सुनतकर उपस्थित होते.