गडअहेरी नाल्याचा रपटा वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:00 AM2018-08-24T00:00:23+5:302018-08-24T00:01:06+5:30
अहेरीजवळील गडअहेरी नाल्याच्या पुलावरील रपट्याचे स्लॅब वाहून गेले. या ठिकाणी माती व दगड शिल्लक आहेत. या पुलावरून मार्गक्रमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरीजवळील गडअहेरी नाल्याच्या पुलावरील रपट्याचे स्लॅब वाहून गेले. या ठिकाणी माती व दगड शिल्लक आहेत. या पुलावरून मार्गक्रमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गडअहेरी नाल्याच्या पलिकडे जवळपास २० गावे आहेत. या नाल्यावरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे नाल्याच्या पाण्याची थोडीफार पातळी वाढल्यानंतर पुलावरून पाणी चढते. चार दिवसांपूर्वी अहेरी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गडअहेरी नाल्यावरील पुलावर पाणी चढले होते. तेव्हा पलिकडील २० गावांचा संपर्क तुटला होता. या पुरादरम्यानच गडअहेरी नाल्यावरील पुलाचे काही स्लॅब वाहून गेले आहे. केवळ आता दगड व माती शिल्लक राहिली आहे. या मातीत वाहन फसत असल्याने मार्गक्रमन करताना नागरिकांना त्रास होत आहे. अहेरी हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुख्य बाजारपेठ असल्याने पलिकडील २० गावातील नागरिकांना अहेरी येथे दैनंदिन कामासाठी यावे लागते. मात्र पुलाची दैनावस्था झाली आहे. दुचाकी वाहन कसेतरी निघू शकते. मात्र चारचाकी वाहन नेणे अशक्य झाले आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सदर पुलाची तत्काळ दुरूस्ती करावी, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी केले आहेत.
गडअहेरी नाल्याची उंची वाढविण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र नवीन उंच पूल बांधण्यासाठी अजूनपर्यंत मान्यता मिळाली नाही. उंच पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.