गडचिराेली शहरात ७० फूट खाेदूनही पाणी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:33+5:302021-07-14T04:41:33+5:30
विटा व सिमेंटच्या घराला माेठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे घर बांधणारा प्रत्येक व्यक्ती घर बांधण्याची सुरुवात करण्यापूर्वी घराच्या ...
विटा व सिमेंटच्या घराला माेठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे घर बांधणारा प्रत्येक व्यक्ती घर बांधण्याची सुरुवात करण्यापूर्वी घराच्या आवारात बाेअरवेल्स खाेदत आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत जेवढी घरे झाली आहेत. तेवढीच बाेअरवेलची संख्याही वाढत चालली आहे. बाेअरवेलच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा हाेत असल्याने पाण्याची पातळी खाेल जात आहे. १० वर्षांपूर्वी शहरात २० फुटांवर पाणी लागत हाेते. आता मात्र ७० फूट खाेदल्याशिवाय पाणीच लागत नाही. काही वाॅर्डांमध्ये तर १०० फूट खाेदल्याशिवाय पाणी लागत नाही. त्यातही पाण्याचे प्रमाण कमी हाेत चालले आहे.
बाॅक्स
विहिरी पडल्या काेरड्या
१० वर्षांपूर्वी बाेअरवेलऐवजी विहीर खाेदण्यास नागरिक प्राधान्य देत हाेते. गडचिरेाली शहरात अनेक नागरिकांकडे विहिरी आहेत. विहिरीची खाेली जास्तीत जास्त ३० फूट आहे. या विहिरींना पूर्वी भरपूर पाणी राहत हाेते. आता मात्र या विहिरी काेरड्या पडल्या आहेत. पावसाळ्यात जेमतेम तीन ते चारच महिने पाणी राहते. उर्वरित आठ महिने या विहिरींना पाणीच राहत नाही. ज्यांच्याकडे विहिरी आहेत त्यांनीही आता बाेअरवेल खाेदणे सुरू केले आहे.
बाॅक्स
गांधी वाॅर्डात सर्वाधिक पाणी
-शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळख असलेल्या गांधी वाॅर्डात व सर्वाेदय वाॅर्डातील विहिरींना सर्वाधिक पाणी आहे. यावरून या वाॅर्डांमधील पाणी पातळी जास्त खाेल नसल्याचे दिसून येते. उन्हाळ्यातही या वाॅर्डातील विहिरींना १५ फूट अंतरावर राहते.
- नवीन वस्ती असलेल्या इंदिरानगर व इतर वाॅर्डांमध्ये ७० फुटाशिवाय पाणी लागत नाही. काही बाेअरवेलला तर १०० फूट खाेदावे लागते.
बाॅक्स
काेणीही यावे बाेअरवेल खाेदावे
भूजलाबाबतचा कायदा शासनाने अजूनही कठाेर केलेला नाही. बाेअरवेल खाेदण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नसल्याने काेणीही कितीही व्यासाचा व खाेलीचे बाेअरवेल खाेदत असल्याचे दिसून येते. बाेअरवेल बाबतची काेणतीही नाेंद प्रशासनाकडे नाही. पाण्याचा असाच वापर सुरू राहिल्यास भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
जलपुनर्भरण नावालाच
भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरेल यासाठी उपाययाेजना करणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाकडून यासाठी फारसे प्रयत्न हाेत नसल्याचे दिसून येत नाही. शासकीय इमारतींना वॅाटर हार्वेस्टींग सिस्टीम बसविणे आवश्यक असले तरी अनेक इमारतींना अशा प्रकारची यंत्रणाच बसविण्यात आली नाही.
बाॅक्स
भूजलवाढीसाठी या उपाययाेजना आवश्यक
१ किमान शासकीय इमारतींना वाॅटर हाॅर्वेस्टींग सिस्टीम बसवावी.
२ पावसाचे पाणी जमिनीत जिरेल यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकामध्ये जागृती करावी.
३ बाेअरवेल खाेदण्यासाठी नाेंदणी आवश्यक करावी. जेणेकरून बाेअरवेल खाेदण्याच्या खाेलीवर नियंत्रण राहील.
४ नळाद्वारे जास्त पाणीपुरवठा केल्यास भूगर्भातील पाण्याचा उपसा कमी हाेईल.
बाॅक्स
शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा-६२.५ दशलक्ष लीटर
एकूण नळ जाेडण्या- ८,५१५
शहरातील एकूण बाेअरवेल- १०,०००
शहराची एकूण लाेकसंख्या-६०,०००