चामाेर्शी महामार्गाच्या नियाेजनशून्य कामामुळे गडचिराेलीकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:41 AM2021-08-13T04:41:31+5:302021-08-13T04:41:31+5:30
गडचिराेली : गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडचिराेली शहरातून कासवगतीने सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून दाेन ते तीन ...
गडचिराेली : गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडचिराेली शहरातून कासवगतीने सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून दाेन ते तीन महिन्यांपासून हे काम प्रभावित झाले आहे. एका बाजूचा रस्ता पूर्णत: खाेदला असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेकांचे छाेटे-माेठे अपघात झाले असून, घाण पाण्याच्या डबक्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
या महामार्गाचे काम सुरुवातीपासूनच नियाेजनबद्ध पद्धतीने केले जात नसल्याचे दिसून येते. शासकीय विज्ञान महाविद्यालय ते पाेस्ट ऑफिसपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या मार्गाचे काम गतीने व याेग्य प्रकारे हाेणे अपेक्षित हाेते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच बांधकाम करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी या सर्वांचे नियाेजन फेल झाले आहे. या महामार्गाच्या रखडलेल्या कामाप्रति अनेक राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही लाेकप्रतिनिधींनी या कामाची पाहणी करून त्याला गती देण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतरही कामाच्या पद्धतीत बदल झाला नाही.
एका बाजूने रस्ता खाेदून ठेवल्यामुळे त्या बाजूच्या लाइनमधील सर्व व्यावसायिक त्रस्त झाले असून, त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आरडाओरड झाल्यानंतर आवागमनासाठी बारीक चुरी टाकण्यात आली. मात्र या चुरीवरूनही दुचाकी वाहने जाऊ शकत नाहीत.
बाॅक्स....
गतीने काम सुरू करा अन्यथा आंदाेलन; शिवसेनेचा इशारा
- केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या गडचिराेली-चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे एका बाजूचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहेत. यापूर्वीही या कामात सातत्य व नियमितपणा नव्हता. कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे गडचिराेलीकरांना प्रचंड त्रास हाेत आहे. केंद्र सरकार व कंत्राटदाराचे साटेलाेटे असल्याने या कामाला मुदतवाढ दिली जात आहे, असा आराेप करीत येत्या आठवडाभरात या मार्गाचे काम गतीने सुरू करावे, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनील पाेरेड्डीवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
- यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. रस्त्याचे काम बंद असून, खाेदकामामुळे खड्ड्यातील पाणी व चिखल पायदळ जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहे. या मार्गाचे काम रखडले असल्याने या मार्गावर अनेकदा वाहतूक प्रभावित हाेत आहे. या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा पाेरेड्डीवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.