गडचिराेलीचा ‘फुलाेरा’ उपक्रम पंतप्रधान पुरस्काराच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातून एकमेव प्राेजेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 10:30 AM2022-03-29T10:30:19+5:302022-03-29T10:32:29+5:30
पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे.
गडचिराेली : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘फुलाेरा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे.
जिल्ह्यातील ५० टक्के शाळा आदिवासीबहुल भागात आहेत. काही विद्यार्थ्यांची मातृभाषा गाेंडी, माडिया, छत्तीसगडी, तेलगू, बंगाली आहे. या विद्यार्थ्यांना मराठी समजत नाही. या विद्यार्थ्यांच्या बाेलीभाषेचा वापर करीत अध्यापन करणे व त्यांना प्रमाणित मराठी भाषा शिकविणे, गणितीय प्रक्रिया सहज साेपी करण्यासाठी अधिकाधिक शैक्षणिक साहित्याचा वापर करणे या उद्देशाने फुलाेरा उपक्रमाची सुरुवात २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात करण्यात आली. सुरुवातीला ३३६ शाळांमध्ये हा उपक्रम प्रायाेगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३४३ शाळांची निवड झाली. सद्यस्थितीत ६७९ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. जून २०२२ अखेरपर्यंत एक हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने जिल्ह्यातील काही निवडक शाळांना भेट देऊन गुुणवत्तेची तपासणी केली असता, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला असल्याचे दिसून आले. त्यानंतर या उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.
वर्ग झाले बालभवनात रूपांतरित
अध्ययनासाठी शैक्षणिक साहित्य हा अतिशय महत्त्वाचा भाग असला तरी, हे साहित्य शाळेतील एखाद्या कपाटात ठेवले जाते. गरज पडेल तेव्हाच ते काढले जाते. फुलाेरा उपक्रमाअंतर्गत बालभवन निर्माण करण्यात आले आहे. वर्गखाेलीलाच बालभवन असे नाव दिले आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी तयार केलेले सर्व शैक्षणिक साहित्य याच ठिकाणी ठेवले जाते.
प्राथमिकस्तर हा विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासाचा पाया आहे. काेराेना काळात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई भरून काढणे आवश्यक आहे. तसेच बाेलीभाषेतून प्रमाणभाषेकडे वाटचाल करण्यासाठी फुलाेरा उपक्रम राबविला. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. ही गडचिराेली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली