बंदी असतानाही भरला गडचिराेलीचा आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:32 AM2021-04-05T04:32:50+5:302021-04-05T04:32:50+5:30
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वीच ...
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वीच आदेश निर्गमित केले आहे. असे असतानाही आदेशाला पायदळी तुडवित ४ एप्रिल राेजी रविवारला गडचिराेली येथे आठवडी बाजार भरला. याला जबाबदार धरत बाजार कंत्राटदाराला पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेळ यांनी तातडीने कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला.
साथराेग अधिनियम, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार काेराेना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्ग राेगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले. साथराेग अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक उपाययाेजना व विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी आवश्यक त्या उपाययाेजना प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत. असे असतानाही गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत साथराेग नियमाचे व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन हाेत असल्याचे दिसून येते.
९ मार्च, २०२१च्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, पुढील आदेशापर्यंत गडचिराेली शहरातील आठवडी बाजार भरणार नाही, अशा सक्त सूचना नगरपालिका प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आल्या हाेत्या. मात्र, असे असतानाही बाजार कंत्राटदार तुकाराम पिपरे यांनी जाणीवपूर्वक आठवडी बाजार भरविला. दरम्यान, काेराेना संसर्गाच्या काळात नागरिकांचे आयुष्य धाेक्यात घातले. याबाबीची नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत, संबंधित कंत्राटदाराला मंजूर केलेला लिलाव काेराेना कालावधीसाठी स्थगित करण्यात येत आहे, तसेच पाच हजार रुपयांचा दंड बाजार कंत्राटदाराला ठाेठाविण्यात आला आहे. या अनुषंगाने अधिकृत आदेश मुख्याधिकारी संजीव ओहाेळ यांनी रविवारी सायंकाळी काढले.
मुख्याधिकाऱ्यांनी एवढ्यावरच न थांबता, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कर विभाग प्रमुख पी.के.खाेब्रागडे यांना प्राधिकृत केले आहे.
बाॅक्स...
मुख्याधिकाऱ्यांनी एकट्यांनीच केला पंचनामा
पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेळ यांनी रविवारी दुपारी ४ वाजतानंतर चंद्रपूर मार्गालगत भरलेल्या आठवडी बाजारात दाखल हाेऊन तेथील विक्रेत्यांशी चर्चा केली. दरम्यान, प्रतीकात्मक स्वरूपात १२ विक्रेत्यांची चाैकशी केली. दरम्यान, बाजार कंत्राटदार तुकाराम पिपरे यांनीच आम्हाला बाजारात बसण्यास सांगितले, अशी माहिती कळाली, शिवाय या बाजारात ब्रह्मपुरी, नागभिड, सावली आदी भागांतून विक्रेते आले असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, पालिकेच्या काेणत्याही कर्मचाऱ्याला साेबत न घेता, मुख्याधिकारी ओहाेळ यांनी स्वत:च्या दुचाकीने बाजार गाठून काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथे विक्रेत्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
बाॅक्स....
आजपासून सहा ठिकाणी हाेणार भाजीपाला विक्रीची व्यवस्था
काेराेना संसर्ग आटाेक्यात आणण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने या संदर्भात नियाेजन करून आठवडी बाजारास पूर्णत: बंदी घातली आहे. दरम्यान, नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये, याकरिता साेमवारपासून चारही मुख्य मार्गालगत सहा ठिकाणी भाजीपाला विक्रीची व्यवस्था साेशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संजीव ओहाेळ यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
बाॅक्स....
कंत्राटदाराला बजावली नाेटीस
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे गांभीर्य लक्षात न घेता व काेराेना प्रादुर्भावास आळा घालण्याच्या प्रयत्नाऐवजी उलट जाणीवपूर्वक आर्थिक हेतूने रविवारी आठवडी बाजार भरविणाऱ्या बाजार कंत्राटदार तुकाराम पिपरे यांना न.प.मुख्याधिकारी संजीव ओहाेळ यांनी तातडीची नाेटीस बजावली. २४ तासांच्या आत याबाबत खुलासा करण्याचे आदेश त्यांनी दिले.