इंधन बचतीत एसटीचा गडचिराेली विभाग राज्यात चौथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:37 AM2021-02-16T04:37:22+5:302021-02-16T04:37:22+5:30
गडचिराेली : २०१९-२० या आर्थिक वर्षात इंधन बचतीत एसटीच्या गडचिराेली विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील ३१ विभागामध्ये चौथा ...
गडचिराेली : २०१९-२० या आर्थिक वर्षात इंधन बचतीत एसटीच्या गडचिराेली विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील ३१ विभागामध्ये चौथा क्रमांक पटकाविला आहे. याबाबत मुंबई येथे १२ फेब्रुवारी राेजी आयाेजित कार्यक्रमादरम्यान गडचिराेली विभागाला चषक देऊन गाैरविण्यात आले. गडचिराेलीचे विभाग नियंत्रक अशाेककुमार वाडीभस्मे यांनी हा चषक स्वीकारला.
एसटीचा सर्वाधिक खर्च डिझेलवर हाेतो. त्यामुळे डिझेलची बचत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. डिझेल बचतीबाबत एसटीच्या सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी इंडियन ऑइल कॉर्पाेरेशन लिमिटेड व राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने इंधन बचतीची स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेत गडचिराेली विभागाने राज्यातून चौथा क्रमांक पटकाविला. गडचिराेली विभागाचा केपीटीएल ५०.४७ एवढा आहे. प्रथम क्रमांक भंडारा, द्वितीय वर्धा, तृतीय चंद्रपूर व पाचवा क्रमांक जालना विभागाने पटकाविला आहे. एसटीचे महाव्यवस्थापक (कवऔस) माधव काळे, महाव्यवस्थापक (यंत्र) रघुनाथ कांबळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी इंडियन ऑइल काॅर्पाेरेशनचे अधिकारी उपस्थित हाेते.