Gadchiroli: दूध विक्री करून परतताना ट्रकने चिरडले, शेतकरी ठार
By संजय तिपाले | Published: February 5, 2024 12:55 PM2024-02-05T12:55:26+5:302024-02-05T12:55:40+5:30
Gadchiroli Accident News: दूध विक्री करून गावी परतताना शेतकऱ्याच्या दुचाकीला ट्रकने चिरडले. यात शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शहराजवळील आरमोरी रस्त्यावरील कठाणी नदीच्या पुलावर घडली.
- संजय तिपाले
गडचिरोली - दूध विक्री करून गावी परतताना शेतकऱ्याच्या दुचाकीला ट्रकने चिरडले. यात शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शहराजवळील आरमोरी रस्त्यावरील कठाणी नदीच्या पुलावर घडली.
मारोती भोयर (५५, रा. महादवाडी ता. गडचिरोली) असे मृताचे नाव आहे. त्यांचा शेतीसह दुग्धव्यवसाय आहे. नित्याप्रमाणे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी घरोघरी जाऊन ग्राहकांना दूध वाटप केल्यानंतर गुरांसाठी पशुखाद्य खरेदी केले. पेंडीचे पोते व कॅन घेऊन ते दुचाकीवरून ( एमएच ३३ एए- ३७७७) गावी परतत होते. आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने (एमएच ३३ डब्ल्यू-२७८६) दुचाकीला जोराची धडक दिली. यानंतर मारोती भोयर हे खाली कोसळले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गडचिरोली पोलिसांनी धाव घेतली.
ट्रकचालकाचे पलायन
या घटनेनंतर चालकाने ट्रक उभा करून पोबारा केला. त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला असून ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.