गडचिरोली अपघात; संतप्त जमावाने पेटवले १५ ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:48 PM2019-01-16T13:48:15+5:302019-01-16T13:49:13+5:30
बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एटापट्टी भागात झालेल्या बस व ट्रकच्या धडकेतील मृतांची संख्या आता पाच झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एटापट्टी भागात झालेल्या बस व ट्रकच्या धडकेतील मृतांची संख्या आता पाच झाली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेली एक बालिका दगावल्याचे वृत्त आहे. तसेच या अपघातामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी या मार्गावरून जाणारे सुमारे १५ ट्रक जाळल्याची तसेच ७ ट्रक्सच्या काचा फोडल्याची बातमी आहे. या अपघाताचे वृत्त झपाट्याने आजूबाजूच्या परिसरात पसरले. एटापल्लीत तातडीने बंद पुकारण्यात आला. येथे सर्वत्र तणावाचे वातावरण असून अपर पोलिस आयुक्त अजयकुमार बंसल हे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
काय आहे घटना?
बुधवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात चार जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला. या बसमध्ये काही प्रवासी अडकल्याचे समजते. सकाळच्या वेळेस निघालेली ही बस शाळकरी विद्यार्थ्यांनी अधिक भरली होती असेही एक वृत्त आहे.
ठार झालेल्यांमध्ये मंजूर करपे (४८) अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली, शामला प्रभाकर डोंगरे (४७) अहेरीच्या कोर्टात लिपीक, प्रकाश पत्रूजी अंबादे (४८) अहेरीच्या वनविभागात कार्यरत व अमोल गावडे, वर्ग १० वा यांचा समावेश आहे.