गडचिरोलीत पुराचा कोप; जनजीवन विस्कळीत, २१०३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 03:01 PM2022-07-14T15:01:44+5:302022-07-14T15:09:16+5:30
आतापर्यंत १७७ कुटुंबांतील २१०३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या १० जुलैपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांसह छोटे नाल्यांना पूर येऊन अनेक मार्ग बंद झाले आहेत. आता जलप्रकल्पांमधून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती आणखीच बिकट होत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी अत्यावश्यक सेवा वगळता शाळा-महाविद्यालयांसह खासगी आस्थापना बंद ठेवण्याच्या आदेशाला पुन्हा शनिवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने दि.११ ते १३ जुलैदरम्यान शाळा-आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता १६ जुलैपर्यंत तो आदेश कायम राहणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी तीन दिवस अतिमहत्त्वाचे काम नसताना बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या काही दिवसांत विदर्भातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. वर्धा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पाणीही वर्धा नदीमार्फत चपराळा येथून वैनगंगेला मिळते. आता गोसीखुर्द धरणातून जास्त पाणी सोडण्यात येत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत वडसा, आरमोरी आणि गडचिरोली येथील वैनगंगा नदीपात्रात व जवळील नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील वडसा, आरमोरी व गडचिरोलीतील गावांना सर्तकतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी, नाले ओलांडण्याचे टाळावे. पाणी पुलावरून वाहात असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गरोदर महिलांना सुखरूप हलविले
सिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीच्या पुरामुळे अनेक भागात स्थिती गंभीर होत आहे. तसेच मेडीगड्डा बॅरेजच्या विसर्गामुळे गोदावरी नदीचे पाणीही काही गावांमध्ये शिरले आहे. अशा पूरग्रस्त भागातून बचाव पथकाने बुधवारी दोन गरोदर महिलांना बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.
अहेरी-सिरोंचातील २१०३ लोकांना हलविले
सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाला. यासोबत गोदावरी, प्राणहिता आणि वैनगंगा नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील २१०३ लोकांना संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांना एसडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. आता पावसाच्या पाण्यापेक्षाही मेडीगड्डा आणि गोसेखुर्द प्रकल्पातून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे काही प्रमुख नद्या आणि उपनद्या फुगल्या आहेत. त्यामुळे नद्यांच्या परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती आणखी बिघडल्याचे दिसून येते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या विसर्गामुळे आता उत्तर गडचिरोली भागातही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.