गडचिरोली चकमक : ठार झालेल्या नक्षलींची संख्या 34 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 06:26 PM2018-04-28T18:26:55+5:302018-04-28T18:26:55+5:30
पोलीस आणि नक्षलींमध्ये 22 एप्रिलला छत्तीसगड सीमेजवळील जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची संख्या आता 34 वर पोहोचली आहे.
गडचिरोली : पोलीस आणि नक्षलींमध्ये 22 एप्रिलला छत्तीसगड सीमेजवळील जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची संख्या आता 34 वर पोहोचली आहे. शनिवारी (28 एप्रिल) एका नक्षलीचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह त्याच परिसरातील जंगलात सापडला. या 34 जणांपैकी 18 जणांची ओळख पटली असून 13 मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शनिवारी शोधमोहीमेदरम्यान एका नक्षलीचा कुजलेला मृतदेह इंद्रावती नदीच्या अलिकडील जंगलात सापडला. परंतू मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.
आतापर्यंत ओळख पटलेल्या 18 जणांच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र त्यापैकी 5 जणांचे मृतदेह अजून नातेवाईकांनी ताब्यात घेतलेले नाहीत. त्यात सुमन कुळयेटी (पडतनपल्ली, ता. भामरागड), शांताबाई उर्फ मंगली पदा (रा.गंगालूर, जि.बिजापूर, छत्तीसगड), तिरूपती उर्फ धर्मू पुंगाटी (रा.केहकापाहरी, ता.भामरागड), राजू उर्फ नरेश कुटके वेलादी (रा.जिजगाव, ता.भामरागड), क्रांती (रा.बस्तर, छत्तीसगड) यांचा समावेश आहे. त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून ते मृतदेह ताब्यात घ्यावेत, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
तसेच इतर मृतदेहांना कोणी ओळखत असतील तर त्यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली किंवा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपर्क साधावा, असेही आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाने केले आहे. नक्षलविरोधी अभियानात ऐतिहासिक ठरलेल्या 22 एप्रिलला झालेल्या चकमकीत 16 मृतदेह जंगलात तर 17 मृतदेह इंद्रावती नदीत सापडले होते. आता आणखी एक मृतदेह जंगलात सापडल्यानंतर चकमकीतील एकूण मृतांची संख्या 34 वर पोहोचली आहे.