अभिमानास्पद! गडचिरोलीचा बोधी रामटेके संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्रॅज्युएट स्टडी प्राेग्राम’मध्ये!
By गेापाल लाजुरकर | Published: July 7, 2024 10:53 PM2024-07-07T22:53:49+5:302024-07-07T22:56:03+5:30
४२ देशांतील ५४ अभ्यासकांमध्ये झाला समावेश
गाेपाल लाजूरकर, गडचिराेली: ‘संयुक्त राष्ट्र’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचा ६२ वा ‘ग्रॅज्युएट स्टडी प्रोग्राम‘ यावर्षी स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथे पार पडतोय. यावर्षी १ हजार ८०० हून अधिक अर्जांपैकी जगभरातील ४२ देशांतील ५४ अभ्यासकांची निवड करण्यात आली आहे. त्यात गडचिरोलीतील तरुण वकील बोधी रामटेके यांचा समावेश आहे.
सन १९६२ पासून सुरू असलेल्या या प्रोग्रामसाठी दरवर्षी जगभरातून युवा अभ्यासकांची निवड केली जाते. ॲड. बोधी मागील वर्षीपासून युरोपीयन कमिशनच्या इरॅस्मस मुंडुस शिष्यवृत्तीच्या माध्यमातून युरोप खंडातील स्पेन, स्वीडन व इंग्लंड देशांमध्ये कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात शाश्वत विकास आणि विकासाचे वित्तनियोजन, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, विज्ञान- तंत्रज्ञान- नावीन्यता आणि डिजिटल सहयोग, युवा आणि सामाजिक बदल अशा अनेक विषयांतील सत्र व संशोधन कार्याचा बोधी भाग असणार आहेत.
स्थानिक प्रश्नांना आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचा फोडण्यासाठी कायम प्रयत्नशील राहायचे आहे. येथील संशोधन व शैक्षणिक अनुभव आणि ज्ञानाचा फायदा देशातील शोषित- वंचित समाजासाठी, रचनात्मक काम उभे करण्यासाठी करायचे आहे.
-बोधी रामटेके, अभ्यासक.