‘मॅरेथाॅन’ने फुलले गडचिराेली शहर; हजारोंच्या संख्येने धावले नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:44 PM2023-03-06T13:44:04+5:302023-03-06T13:45:35+5:30

स्पर्धकांमुळे जिल्हा परिषदेचा परिसर फुलून गेला हाेता

Gadchiroli city flourished with 'Marathon', around 10 thousand citizens participate | ‘मॅरेथाॅन’ने फुलले गडचिराेली शहर; हजारोंच्या संख्येने धावले नागरिक

‘मॅरेथाॅन’ने फुलले गडचिराेली शहर; हजारोंच्या संख्येने धावले नागरिक

googlenewsNext

गडचिराेली : गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने ‘एक धाव आदिवासींच्या विकासासाठी’ या संकल्पनेतून ५ मार्च राेजी जिल्हा परिषदेच्या मैदानावरून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते. जिल्ह्यातील जवळपास १० हजार युवक, युवती व नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. मॅरेथाॅनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी पिवळी टी-शर्ट घातली हाेती. स्पर्धकांमुळे जिल्हा परिषदेचा परिसर फुलून गेला हाेता.

यावेळी आ. डाॅ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, न्यायाधीश आर. आर. पाटील, चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, वनसंरक्षक किशोर मानकर, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता, कमांडंट आर. एस. बाळापूरकर, एम. एच. खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित हाेते.

जिल्ह्यातील युवक-युवतींनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन चांगली कामगिरी करावी. त्यांच्यामध्ये स्पर्धा करण्याची जिद्द निर्माण व्हावी यासाठी मॅरेथाॅन स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. ही स्पर्धा ३ किमी, ५ किमी व १० किमी अशा वेगवेगळ्या तीन प्रकारांत घेण्यात आली. प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय असे एकूण ९ महिला व पुरुषांनी विजेतेपद पटकाविले. तसेच ज्येष्ठ नागरिक या गटातील एकूण ३ महिला, ३ पुरुषांनी विजेतेपद पटकाविले. ३ किमी स्पर्धेत प्रथम विजेत्याला १२ हजार, द्वितीय विजेत्याला ८ हजार व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ५ हजार रुपयांचे बक्षीस, प्रमाणपत्र व ट्राॅफी देण्यात आली. ५ किमी स्पर्धेत प्रथम विजेत्याला १५ हजार रुपये, द्वितीय विजेत्याला ११ हजार रुपये व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ८ हजार रुपयांचे बक्षीस, ट्राॅफी व सन्मानपत्र देण्यात आले.

१० किमी स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला २१ हजार रुपये, द्वितीय विजेत्याला १५ हजार रुपये व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला १२ हजार रुपये राेख रक्कम, ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले. सकाळी ५:३० वाजता मॅरेथाॅन स्पर्धेला सुरुवात झाली. सकाळी ९:३० वाजता सांगता करण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना टी-शर्ट व सहभागीचे प्रमाणपत्र तसेच नाष्टा देण्यात आला. स्पर्धकांचा उत्साह वाढावा यासाठी झुंबा डीजेची सोय करण्यात आली होती. तसेच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पोलिस दलाच्या अधिकृत यूट्यूब चैनेलवर करण्यात आले. स्पर्धा जिल्हा परिषद मैदानापासून सुरू होऊन चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौक, रिलायन्स पेट्रोलपंप, कारगील चौक, इंदिरा गांधी चौक, बसस्थानक व परत जिल्हा परिषदेचे मैदान अशी हाेती.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनूज तारे, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक वतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्वप्नील जाधव, मयूर भुजबळ यांच्यासह पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

ग्रामीण भागातील युवकांनी वाढविली मॅरेथाॅनची रंगत

- मॅरेथाॅनमध्ये जिल्हाभरातील युवकांनी सहभाग घेतला हाेता. मॅरेथाॅन सकाळीच हाेणार असल्याने शनिवारी सायंकाळीच युवक गडचिराेलीत दाखल झाले हाेते. त्यांना ने-आण करणे व राहण्याची व्यवस्था पाेलिस विभागाने केली हाेती. एकूण स्पर्धकांमध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांची संख्या जवळपास निम्मी हाेती.

- प्रत्येक स्पर्धकाला पिवळी टी-शर्ट देण्यात आले हाेते. या टी-शर्टमुळे स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यास फार माेठी मदत झाली.

चाेख पाेलिस बंदाेबस्त

मॅरेथाॅन स्पर्धेदरम्यान काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी काॅम्प्लेक्स ते बसस्थानकापर्यंत चाेख पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

Web Title: Gadchiroli city flourished with 'Marathon', around 10 thousand citizens participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.