स्वच्छतेत गडचिरोली शहरात सारेच फेल
By admin | Published: November 10, 2014 10:42 PM2014-11-10T22:42:15+5:302014-11-10T22:42:15+5:30
देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. गडचिरोली शहरातील सरकारी कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे.
दिगांबर जवादे - गडचिरोली
देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. गडचिरोली शहरातील सरकारी कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे. हे पाहण्यासाठी आज लोकमतने शहरातील तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय व पंचायत समिती या तीन शासकीय आस्थापनांना भेटी देऊन येथील स्वच्छतागृहांची परिस्थिती जाणली. अतिशय विदारक परिस्थिती या तिनही ठिकाणी असल्याचे लोकमतच्या या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले आहे. या कार्यालयातील कर्मचारीही या अस्वच्छतेमुळे त्रस्त आहेत. परंतु स्वत: स्वच्छता करण्याची त्यांची तयारी नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.स्वच्छता कर्मचाऱ्यानेच सर्व स्वछता करावी. त्याच्यावरच सारे अवलंबून आहेत, असे एकूण चित्र दिसून आले.
शौचालय व स्वच्छतागृहात केवळ घाणच
लोकमतच्या प्रतिनिधीने सकाळी १०.१५ वाजता गडचिरोली येथील तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रतिनिधी सरळ तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहात गेले. येथे काय परिस्थिती आहे, हे जाणल्यावर विदारक चित्र समोर आले. पुरूषांच्या स्वच्छतागृहात तीन शौचालय, दोन बेसीन व चार मुताऱ्या असल्याचे दिसून आले. या ठिकाणी पाण्याचे पाईप असले तरी पाणीपुरवठा मात्र बंद होता. शौचालयाच्या समोरच एक मोठे टाके व रांजन भरले होते. त्यामध्ये पाणी भरून दिसले. शौचालयांची अवस्था मात्र अत्यंत बकाल दिसली. नाकाला रूमाल लावूनच शौचालयात प्रवेश करावा लागतो, अशी घाण या ठिकाणी पसरलेली आढळली. मुताऱ्यांमध्ये खर्राच्या पन्न्या ठेवण्यात आल्या आहे, असे दिसून आले. जागोजागी टाईल्स लावलेल्या भिंतीवर खर्राच्या पिचकाऱ्या उडलेल्या दिसल्या. याचा वापर करणारे कर्मचारी टाक्यातील पाणी घेऊन तेथे टाकत नसावे, असे स्पष्टपणे दिसून आले. बाजुलाच महिलांचे शौचालय आहे. शौचालयाकडे जाणारा मुख्य दरवाजाचे तावदान पूर्णपणे तुटले आहे. त्याचबरोबर शौचालयाचेही तावदान पूर्णपणे तुटले आहे. त्यामुळे दरवाजाचा अर्धाभाग पूर्णपणे मोकळा असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीतही महिला कर्मचाऱ्यांना याचा वापर नाईलाजास्ताव करावा लागतो, असेही दिसून आले. तहसीलदारांच्या कक्षाच्या मागेच त्यांचे स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहातील लाईट बंद असल्याने पूर्णपणे अंधार पसरला असल्याचे दिसले. शौचालयाची सीट मागील एक महिन्यापासून अस्वच्छ असावी, एवढे घाण तेथे जमा आहे, असे दिसून आले.
महिलांचे स्वच्छतागृह कुलूपबंद
वेळ सकाळी १०.३५ वाजता
उपविभागीय कार्यालयाचे शौचालय कार्यालयाच्या अगदी मागे आहे. शौचालयाच्या चारही बाजुला मोठमोठे गवत उगविले आहे. पुरूषांच्या शौचालयात दगड, रेती पसरलेली दिसून आली. कर्मचारी सदर शौचालयाचा अजिबात वापर न करता शौचालयाच्या बाहेरच लघुशंकेसाठी जातात, असे दिसून आले आहे. येथे आजुबाजूला तशी अवस्था दिसून आली. महिलांसाठी दुसऱ्या बाजुला असलेले शौचालय कुलूप बंद स्थितीत आढळून आले. सदर शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने कार्यालयाच्या प्रशासनाला विनंती केली असता, तेथे उपस्थित कर्मचाऱ्याने दरवाजा उघडून दाखविला. आतमध्ये उंदीराची विष्टा मोठ्या प्रमाणावर जमा असल्याचे दिसून आले. संपूर्ण शौचालय जाळे व झुरळांनी व्यापलेले दिसले. शौचालयाच्यावर पाण्याची टाकी दिसून आली. मात्र त्यात पाण्याची साठवणूक होत नाही, असे दिसून आले. शौचालयात नळांना तोट्या लावलेल्या नाही. त्यामुळे पाण्याची साठवणूक या ठिकाणी होतच नाही, असे दिसून आले. कुलूप बंद असलेल्या महिला शौचालयाबाबत येथील महिला कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, लघुशंका व शौचासाठी कार्यालयीन वेळेत नाईलाजास्तव तहसील कार्यालय गाठावे लागते, असे त्यांनी सांगितले. शौचालयाची दुरूस्ती करण्याची मागणीही केली. येथील शौचालयाचा परिसर हा झुडुपी गवताने व्यापून गेला असल्याने याचा वापर येथील कर्मचारी अजिबाद करीत नसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले.