'गडचिराेली मध्यवर्ती' ठरली क्यूआर काेड सेवा देणारी राज्यातील पहिली बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 12:36 PM2022-04-06T12:36:30+5:302022-04-06T12:38:08+5:30
आरटीजीएस, युपीआय, एटीएम यांसारख्या सुविधा यापूर्वीच उपलब्ध आहेत. त्यात आता क्यूआर काेडची भर पडली आहे.
गडचिराेली : गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५ एप्रिलपासून ग्राहकांसाठी क्यूआर काेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा बहुमान पटकाविणारी राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी ही पहिली बँक ठरली आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थिती अतिशय वाईट आहे. अशा स्थितीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र याला अपवाद ठरत आहे. राष्ट्रीयीकृत, तसेच खासगी बँकांपेक्षाही अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. आरटीजीएस, युपीआय, एटीएम यांसारख्या सुविधा यापूर्वीच उपलब्ध आहेत. त्यात आता क्यूआर काेडची भर पडली आहे.
डिजिटल बँकिंगमध्ये क्यूआर काेडचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाभरातील व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत क्यूआर काेड सेवेचा शुभारंभ ५ एप्रिल राेजी गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरविंद पाेरेड्डीवार, बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सीईओ सतीश आयलवार आदी मान्यवर उपस्थित हाेते.
सर्वांत कमी एनपीए असणारी बँक
बॅँकेचा एनपीए (नाॅन परफार्मिंग असेट) १० टक्क्यांपेक्षा कमी असावा, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. मात्र, राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ही मर्यादा ओलांडली आहे. एनपीए वाढल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. अशा स्थितीत आदिवासीबहुल भागात शाखा असलेल्या गडचिराेली सहकारी बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के व ग्राॅस एनपीए १.२२ टक्के एवढा आहे. विशेष म्हणजे, राज्यात सर्वांत कमी एनपीए सातारा बँकेनंतर गडचिराेली बँकेचा आहे. ही बाब गडचिराेली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार यांनी व्यक्त केली.