गडचिरोलीतील गावकऱ्यांनी झुगारले नक्षलवाद्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 03:06 PM2019-03-22T15:06:07+5:302019-03-22T15:08:12+5:30
लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा नक्षल्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनी विरोध करीत नक्षल बॅनरची गुरूवारी होळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन करणारे बॅनर नक्षल्यांनी धानोरा तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या काकडवेली गावाजवळ बांधले होते. नक्षल्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनी विरोध करीत नक्षल बॅनरची गुरूवारी होळी केली.
नक्षलवाद्यांचा लोकशाहीला विरोध असल्याने ते निवडणुकीलाही विरोध करतात. त्यामुळेच निवडणुकीच्या कालावधीत घातपाताच्या घटना घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो. यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही नागरिकांनी मतदान करू नये यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून धानोरा तालुक्यातील काकडवेली गावाजवळ नक्षल्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना नक्षल बॅनर बांधले. यात नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा. कोणीही मतदान करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्रकेही टाकण्यात आली आहेत.
सामान्य जनतेच्या विकासात लोकशाहीचे महत्त्व व त्यासाठी आवश्यक असलेले मतदान याचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. काकडवेलीच्या गावकऱ्यांनी नक्षल्यांच्या धमकीला न जुमानता बॅनरचीच होळी करून नक्षलवाद्यांचा विरोध केला. नक्षलवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या.
दरम्यान मतदान वाढावे यासाठी प्रशासनाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. त्यामुळे नागरिक मतदानासाठी बाहेर निघतील अशी अपेक्षा आहे. परिणामी मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे.