चार दशकांपासून रखडले गडचिरोलीचे पर्यटन; मार्ग होणार का मोकळा? नव्या सरकारकडून अपेक्षा
By मनोज ताजने | Published: November 18, 2022 11:33 AM2022-11-18T11:33:49+5:302022-11-18T11:41:24+5:30
नक्षल्यांची दहशत कमी; आता पर्यटनास चालना मिळणार का?
गडचिरोली : गेल्या चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्याला बसलेला नक्षली दहशतीचा फास आता बऱ्याच प्रमाणात सैल झाला आहे. जिल्ह्यात सक्रिय नक्षलींची संख्याही मोजकीच राहिली आहे. रखडलेली विकासात्मक कामेसुद्धा हळूहळू मार्गी लागत आहेत; पण आतापर्यंत नक्षल दहशतीच्या नावाखाली दुर्लक्षित राहिलेल्या जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना कधी मिळणार? आणि त्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल का? अशी आस जिल्हावासीयांना लागली आहे.
राज्यात सर्वाधिक जंगल असलेला गडचिरोली जिल्हा केवळ नक्षलवाद्यांमुळे राज्यातच नाही तर देशभरात ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करणारी काही ठिकाणे आहेत याची कल्पना अनेकांना नाही. या जिल्ह्यात बाहेरील पर्यटक येतील असा विचारही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींच्या मनात गेल्या अनेक वर्षांत डोकावला नाही पण आता बदललेल्या स्थितीमुळे या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. उद्योगविरहित पण निसर्गसौंदर्याने नटलेल्या या जिल्ह्यात पर्यटनाला उद्योगाच्या नजरेतून पाहून विकसित केल्यास रोजगार, स्वयंरोजगाराला चालना मिळून या जिल्ह्याचे मागासलेपण दूर होण्यास मोठी मदत मिळू शकेल.
पर्यटन सर्किट तयार करा
- शहरी गजबजाटापासून दूर जाऊन चार दिवस शांतपणे नैसर्गिक वातावरणात राहण्यासाठी मुंबई-पुण्याकडील अनेक पर्यटक गडचिरोली जिल्ह्यात येत असतात. त्यातील बहुतांश लोक भामरागडजवळच्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन तेथील विविध प्राणी, पक्षी पाहतात. पण जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळ कोणते आणि तिथे कसे जायचे याची माहिती आणि मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. त्यामुळे एवढ्या लांब येऊनही त्यांना त्या स्थळांच्या भेटीपासून वंचित राहावे लागते.
- वास्तविक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची संख्या पाहता किमान तीन ते चार दिवस पाहता येईल एवढी ठिकाणं या जिल्ह्यात आहेत. त्यासाठी पर्यटन सर्किट तयार करून वाहन, निवासाची योग्य व्यवस्था करून दिल्यास पर्यटकांचा ओढा या जिल्ह्याकडे निश्चितपणे वाढेल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मार्गदर्शक पुस्तिकेसह योग्य मार्केटिंग केल्यास गडचिरोली जिल्ह्याची ‘नक्षल्यांचा जिल्हा’ ही ओळख पुसल्या जाऊन ‘पर्यटनाचा जिल्हा’ अशी नवी ओळख मिळाल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे गडचिरोलीत पाहण्यासारखे?
१) हत्ती कॅम्प : पाळीव हत्ती असलेला महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील कमलापूर येथे आहे. या ठिकाणी मोकळ्या जंगलात फिरणारे, पाण्यात खेळणारे ८ हत्ती जवळून पाहता येतात.
२) डायनासोरचे जिवाष्म : हजारो वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे जिवाष्म सिरोंचा तालुक्यातील वडधम येथे सापडले आहेत. पर्यटकांसाठी ते जसेच्या तसे जतन केले असले तरी त्या ठिकाणी आणखी उत्खनन केल्यास संशोधनाला आणि पर्यटनाला वाव मिळेल.
३) ग्लोरी ऑफ फॉरेस्ट : उच्च प्रतीच्या आणि उंच व घेरदार साग वृक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली ते भामरागड मार्गावरील ‘ग्लोरी ऑफ फॉरेस्ट’ सध्या दुर्लक्षित आहे. पर्यटकांसाठी तिथे विसावा, नाष्ट्याची सुविधा नाही.
४) त्रिवेणी संगम : भामरागडलगत पर्लकोटा, इंद्रावती आणि पामुलगौतम या नद्यांच्या संगमाचे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे पण पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा तिथे नाही.
५) आमटेज ॲनिमल आर्क : भामरागडच्या आधी हेमलकसा येथे प्रसिद्ध समाजसेवी डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी वसविलेला आणि त्यांचे वास्तव्य असणारा लोकबिरादरी प्रकल्प, तेथील वन्यप्राण्यांचे माणसाळलेपण पर्यटकांसाठी आकर्षण आहे.
६) मार्कंडेश्वर मंदिर : चामोर्शी तालुक्यात उत्तरवाहिनी वैनगंगा नदीतिरावर असलेल्या हेमाडपंथी मार्कंडेश्वर शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या सहा वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या वेळकाढूपणामुळे रखडले आहे. त्याला गती देऊन तिथे पर्यटकांसाठी सुविधा वाढविण्याची गरज आहे.
७) मेडीगड्डा प्रकल्प : महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेला मेडीगड्डा प्रकल्प मध्य भारतातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो. ‘लक्ष्मी बॅरेज’ असेही या प्रकल्पाचे नाव असून त्याला ८५ दरवाजे आहेत. हा भव्य जलप्रकल्प पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे.