गडचिरोली जिल्ह्यात दोन महिलांसह शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 07:36 PM2020-07-23T19:36:00+5:302020-07-23T19:37:51+5:30
गडचिरोली जिल्ह्यात तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन दोन महिला तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या घटनेत मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यात गुरूवारी (दि.२३) सकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज प्रवाहाच्या धक्क्याने दोन महिला मजुरांसह एका तरुण शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. एका घटनेत तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन दोन महिला तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या घटनेत मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या मुडझा येथील वरगंटीवार यांच्या शेतात धान रोवणीसाठी काही मजूर ट्रॅक्टरने जात होते. पण पुढे चिखल असल्यामुळे ट्रॅक्टर जाऊ शकत नव्हता. त्यामुळे पायी जाण्यासाठी निघालेल्या नंदा पुंडलिक नैताम (६०) आणि अंजना गोपाळा राऊत (६५) (दोघीही राहणार गोकुलनगर, गडचिरोली) यांचा रस्त्यावर तुटून पडलेल्या वीजवाहक तारांना स्पर्श झाला. त्यामुळे दोघीनाही जोरदार धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. वीज तारा तुटून पडलेल्या असताना महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष नव्हते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच दोन महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जात आहे. महावितरण कंपनीसह महसूल व पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुसºया घटनेत कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला (पुराडा) येथील शेतात रोवणीच्या कामासाठी सती नदीच्या काठावरील विहीरीत असलेला मोटारपंप सुरू करण्यासाठी उमेश कांशीराम काटेंगे (३०) हा शेतकरी गेला होता. त्याच्या हाताचा स्पर्श बटनला होताच जबर धक्का बसला आणि तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला. त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तो विवाहित असून त्याला तीन मुली आहेत. पत्नीच्या नावे दोन एकर शेती आहे.