गडचिरोली जिल्ह्यात तीन पिढ्यांची ‘गळ उत्सव’ परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:49 AM2018-03-03T11:49:10+5:302018-03-03T11:49:19+5:30
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चारही जिल्ह्याच्या सुमारे ३५ चौरस किमीचा भूक्षेत्र झाडीपट्टी म्हणून नावाजलेला आहे. झाडीपट्टीत गेली शेकडो वर्षांपासून विशेषदिनी सण, उत्सव, यात्रा साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रांतात अतिपूर्वेकडील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चारही जिल्ह्याच्या सुमारे ३५ चौरस किमीचा भूक्षेत्र झाडीपट्टी म्हणून नावाजलेला आहे. झाडीपट्टीत गेली शेकडो वर्षांपासून विशेषदिनी सण, उत्सव, यात्रा साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील नावलौकिकप्राप्त कोंढाळा गावात मागील तीन पिढ्यांच्याही आधीपासून होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी मेघनाद जत्रा ‘गळ उत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोंढाळास्थित बुराडे कुटुंबीय सदर गळ उत्सवाचे नेतृत्व करते. सर्वप्रथम ठाणा म्हणजे देविदेवतांची पेटी डहाक्यांच्या साथीने वाजतगाजत विधिवत गळ ज्या ठिकाणी साजरा केला जातो, त्या स्थळी नेली जाते. प्रारंभीच्या काळात वनवैभवाने नटलेल्या या परिसरात झाडांची खूप गर्दी होती. त्यामुळे मोह झाडापासून बनवलेला लाकडी खांब चारपाच बैलबंड्यांच्या साथीने जंगलातून थेट गावात आणला जात असे. पण आता गावातील एका चौकात पूर्वी लाकडांपासून परंतु आता सिमेंट काँक्रिटने बांधलेले स्थायी उंच दंडगोलाकार खांब उभे केलेले आहेत. या खांबाच्या वरच्या टोकावर आडवी पट्टी आणि त्याला लांब दोर बांधला जातो. डहाक्यांच्या आवाजात येथे पूजापाठ केली जाते. या उत्सवात गावकरी तसेच पंचक्रोशीतील जनता आनंदात सहभागी होते. लहानमोठ्या दुकानांनी कोंढाळाची रस्ते व मोकळी जागा भरून जात असल्याने गावाला या दिवशी जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात मनोरंजनाची अनेकविध साधने हातात उपलब्ध झाल्याने सदर गळ उत्सवाला पूर्वीच्या सुरुवातीच्या कालखंडात लोकसंघटीत करून त्यामधून एकोपा आणि मनोरंजन अशी दुहेरी कला साधून हा उत्सव साजरा केला जायचा. मात्र आज बदलत्या काळानुसार या उत्सवाची ऊर्जा आणि गर्दी कुठेतरी लोप पावत असल्याचे दिसून येते.