गडचिरोली जिल्ह्याच्या पेसातील निवृत्त शिक्षक भरतीचे 'वांधे'!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:49 PM2024-08-01T15:49:02+5:302024-08-01T15:50:43+5:30
दुर्गम-अतिदुर्गम भागात द्यावी लागणार सेवा : जिल्ह्यात ५८८ जागा, अर्ज केवळ १४३
दिलीप दहेलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या 'पेसा' क्षेत्रातील शिक्षक भरती शिक्षण सेवकाऐवजी कंत्राटी पद्धतीने महिनाभरात भरावीत, असे निर्देश राज्य शासनाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील शाळांमधील रिक्त ५८५ जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, केवळ १४३ अर्ज आले आहेत.
जि. प. प्रशासनाने यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागविले, मात्र रिक्त जागांच्या तुलनेत अत्यल्प अर्ज प्राप्त झाले आहे. त्यातच मानधनावर दुर्गम भागात सेवा द्यावी लागणार असल्याने बहुतांश सेवानिवृत्त शिक्षक यासाठी तयार नाहीत. याशिवाय वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. एकूणच जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक भरतीचे 'वांधे' झाले असून प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली आहे.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार 'पेसा' क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
या भरती प्रक्रियेत सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास नव्याने निवड प्राप्त उमेदवाराला दरमहा २० हजार रुपयांचे मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात असणार आहेत.
संघटनांचा भरतीला विरोध कायम
शासनाच्या आदेशानुसार, निवृत्त शिक्षकांना पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर नियुक्त करण्याची सूचना ताबडतोब मागे घेऊन जिल्ह्यातील पात्र स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी, तसे न झाल्यास ज्या शाळेत निवृत्त शिक्षक नियुक्त झाले अशा शाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा बेरोजगार उमेदवारांच्या संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.
जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे - ७००
पेसा क्षेत्रात रिक्त पदे - ५८८
एकूण अर्ज प्राप्त - १४३
या जिल्ह्यांत सुरू आहे सेवानिवृत्त शिक्षक भरती प्रक्रिया
पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम १९९६ (पैसा) हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. या कायद्याअंतर्गत राज्यातील गडचिरोली, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर व या जिल्ह्यांना पेसा हा कायदा लागू आहे. या जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या शाळांमधील रिक्त पदे सेवानिवृत्त शिक्षकांमधून तात्पुरत्या स्वरूपात भरली जात आहे.
मूळ तालुक्यातून दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते नियुक्ती
धानोरा तालुक्यात वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना अहेरी उपविभागात कोणत्याही तालुक्यात कोणत्याही शाळेत रिक्त असलेल्या जागांवर जि. प. प्रशासनाच्या वतीने नियुक्त्ती देण्यात येणार आहे. २० हजार रुपयांचे मानधनासाठी त्यांना स्वतःचे गाव व कुटुंबांपासून दूर जावे लागणार आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्र मागविल्याने अडचण
वयाचे ६० वर्ष पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा शाळेत सेवा देण्याची संधी दिली जात आहे. यासाठी त्यांना महिन्याला २० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. मात्र अर्ज केलेल्या व इच्छुक शिक्षकांना शिक्षण विभागाच्या वतीने फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक केले असल्याने शिक्षकांची मोठी गोची झाली आहे. कारण या वयामध्ये अनेक शिक्षकांना बीपी, शुगर, अस्थमा, लकवा, मणक्याचे आजार तसेच इतर कोणते ना कोणते आजार आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळणे कठीण आहे.
तालुकानिहाय प्राप्त अर्ज
तालुका अर्ज
धानोरा ०४
सिरोंचा ०६
गडचिरोली ३०
एटापल्ली ०२
आरमोरी २३
देसाईगंज १६
कुरखेडा ३५
मुलचेरा ०५
अहेरी १२