अपघातविरहित वाहतुकीत गडचिरोली विभाग राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 01:08 AM2017-06-03T01:08:10+5:302017-06-03T01:08:10+5:30
नक्षलग्रस्त आणि भौगोलिक क्षेत्रातील ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाने
नफ्यातही आघाडीवर : एसटीचा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि भौगोलिक क्षेत्रातील ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाने अपघातविरहित सेवेत राज्यात आघाडी घेतली आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही नफ्यात येणाऱ्या राज्यातील केवळ दोन विभागात गडचिरोली विभागाचा समावेश आहे हे विशेष.
एसटी महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी (१ जून) गडचिरोलीचे विभागीय नियंत्रक विनय गव्हाळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ६९ वर्षापूर्वी एसटी महामंडळाची पहिली बस अहमदनगर ते पुणे अशी धावली होती. आज महामंडळाच्या १७ हजार बसेस आहेत. त्यात गडचिरोली विभागात २६० बसेस चालतात. विभागांतर्गत गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि अहेरी या तीन आगारांमध्ये आज ५० वाहक आणि ४० चालकांची कमतरता आहे. मात्र तरीही हा विभाग नफ्यात आहे. केवळ लातूर आणि गडचिरोली हे दोनच विभाग नफ्यात असल्याची माहिती गव्हाळे यांनी दिली.
या विभागात अपघाताचे प्रमाण वर्षात ०.०८ टक्के आहे. उन्हाळी सुट्यांमध्ये १०५ मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसेस प्रवासी सेवेत घेतल्या जातात. त्यामुळे दररोज २५ ते ३० लाखांचे उत्पन्न महामंडळाला होत आहे. मनुष्यबळ भरल्यनंतर तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या फेऱ्या वाढणार आहेत.
प्रवाशांना दिले गुलाबपुष्प
एसटी महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी सकाळी गडचिरोली ते नांदेड या बसला फुलांनी सजवून पाठविले. तसेच एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना गुलाबपुष्प दिले आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या बसेसनेच प्रवास करण्याचे आवाहन केले. यावेळी आगार व्यवस्थापक विनेश बावणे, वाहतूक निरीक्षक के.जे. लिंगलवार, सहा.निरीक्षक सोनी लिचडे, सुधाकर कामडी, लिपिक श्रीकांत दुपारे, विवेक फाये, नवीन बनवाल आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली विभागात टीम वर्क चांगले आहे. शिवाय खेळीमेळीचे वातावरण आहे. बसगाड्यांच्या स्वच्छतेसोबत प्रशाशांसोबत सौजन्याची वागणूक ठेवली जाते. त्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेसारख्या अनेक अडचणी असतानाही सर्वजण अडचणींवर मात करून चांगले काम करीत आहेत.
- विनय गव्हाळे,
विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, गडचिरोली