Gadchiroli: नक्षल्यांना घाबरू नका... पोलिस सुरक्षेसाठी सज्ज, पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची ग्वाही
By संजय तिपाले | Published: May 12, 2023 04:29 PM2023-05-12T16:29:50+5:302023-05-12T16:30:13+5:30
Gadchiroli: नक्षलवाद्यांना घाबरण्याची गरज नाही, पोलिस आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. पोलिस दादालोरा खिडकी या उपक्रमाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या, मुलांना शिकवा व विकासाकडे वाटचाल करा, असे आवाहन पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले.
- संजय तिपाले
गडचिरोली: नक्षलवाद्यांना घाबरण्याची गरज नाही, पोलिस आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. पोलिस दादालोरा खिडकी या उपक्रमाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या, मुलांना शिकवा व विकासाकडे वाटचाल करा, असे आवाहन पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले.
एटापल्ली येथे १२ मे रोजी पोलिस महासंचालकांच्या हस्ते पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता, हेडरीचे उपअधीक्षक बाबूराव धडस, पो.नि. विजयानंद पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जनजागरण मेळाव्यात रजनीश सेठ यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना शेतीसाहित्य, कपडे, विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी रजनीश सेठ यांनीआदिवासी बांधवांशी संवाद साधला. एटापल्लीत येऊन आनंद झाला. पोलिस ठाण्यांत ग्रंथालय उभारणीची कामे सुरु आहेत. यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय होईल, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाल्याने दुर्गम भागातही अधिकारी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन करुन आभार उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी मानले.
पिपली बुर्गीत जवानांशी संवाद
दरम्यान, तत्पूर्वी महासंचालक रजनीश सेठ यांनी पिपली बुर्गी (ता.एटापल्ली) या दुर्गम भागात ११ मे रोजी सुरु झालेल्या पोलिस मदत केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
पारंपरिक आदिवासी नृत्य, वाद्यांनी स्वागत
रजनीश सेठ यांचे एटापल्लीत आगमन झाल्यावर आदिवासी बांधवांनी त्यांचे पारंपरिक नृत्य व वाद्य वाजवून स्वागत केले. राजीव गांधी चौक ते पोलिस ठाण्यापर्यंत मान्यवर पायी गेले.