अतिक्रमणधारकांना आता मिळणार हक्काचे छत; ठिय्या आंदोलन स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:34 PM2023-06-24T12:34:56+5:302023-06-24T12:36:18+5:30
मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन : १९० झोपड्यांवर फिरवला होता बुलडोजर
गडचिराेली : शहराच्या गाेकुलनगरातील एकता नगर झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या ज्या नागरिकांच्या १९० झोपड्या अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत बुलडोजर लावून उद्ध्वस्त केल्या. त्या सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक-३ अंतर्गत घरे बांधून देण्याचे लेखी पत्र वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातील झोपडपट्टीधारकांच्या ठिय्या आंदोलनकर्त्याना शुक्रवारी दोन दिवसांनंतर स्थानिक न. प. प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य झाल्याने झोपडपट्टीधारकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदाेलनावर अखेर ताेडगा निघाला.
सदर अतिक्रमित सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक -३ अंतर्गत घरे बांधून देण्याचे लेखी पत्र वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातील झोपडपट्टीधारकांच्या ठिय्या आंदोलनकर्त्याना देण्यात आल्याची माहिती २३ जूनला नगरपरिषद सभागृहात नगरपरिषद व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पत्रकार परिषदेत नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे पंतप्रधान आवास योजनेचे प्रमुख अंकुश भालेराव, झोपडपट्टी आंदोलनाचे प्रमुख तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी. के. बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, महिला आघाडीच्या प्रवक्त्या माला भजगवळी, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, मीडिया प्रमुख जावेद शेख, विपीन सूर्यवंशी, शकुंतला दुधे, शशिकला शेरकी, वंदना येडमे, सुजाता दुधे, शिल्पा वासनिक, कवडू दुधे आदी उपस्थित होते. दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत घरकुल बांधून देण्याचे लेखी पत्र झोपडपट्टी आंदोलकांना देण्यात आले आहे तसेच अतिक्रमण हटविताना झालेल्या नुकसानीच्या संदर्भाने चौकशी करून अहवाल तयार करून निर्णय घेतल्या जाईल, उपमुख्याधिकारी भंडारवार यांनी सांगितले.
'लोकमत'ने वेधले लक्ष
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान गोरगरीब व वंचित कुटुंबांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरवून त्यांचे संसारोपयोगी साहित्य उचलून नेल्याने बेघर होण्याची वेळ आली होती. 'लोकमत'ने स्पॉट रिपोर्टिंग करून अतिक्रमणधारकांच्या व्यथांना वाचा फोडून लक्ष वेधले. त्यानंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
गोरगरिब लाेकसुद्धा या देशाचे नागरिक आहेत त्यांना असणाऱ्या संविधानिक हक्क आणि अधिकाराची पायमल्ली होता कामा नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेऊन मानवतावादाचे हनन थांबविले पाहिजे. अन्यायाच्या विरोधात वंचितचे सगळे पदाधिकारी झोपडपट्टीवासीयांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने झोपडपट्टीधारकांच्या मागण्या लेखी पत्र देऊन मान्य केल्या आहेत हे आमच्या आंदोलनाचे यश आहे.
- बाळू टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
--