Gadchiroli Naxal Attack: 'नाश्ता अर्ध्यावर सोडून तो ड्युटीवर गेला होता... परत आलाच नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 10:38 AM2019-05-03T10:38:58+5:302019-05-03T10:41:03+5:30
Gadchiroli Naxal Attack: 'नाश्ता अर्ध्यावर सोडून तो ड्युटीवर गेला होता... परत आलाच नाही!'
गडचिरोली: गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी-60 हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवान शहीद झाले. या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात खासगी वाहन चालक असलेल्या तोमेश्वर भागवत सिंगनाथ याचाही मृत्यू झाला. सिंगनाथ याला शहिदाचा दर्जा देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सिंगनाथ यांच्या परिवाराला योग्य मदत देऊ, असं आश्वासनं पोलीस महानिरीक्षकांनी दिलं आहे.
तोमेश्वर सिंगनाथ हा भरल्या नाश्त्यावरून उठून ड्युटीवर निघून गेला आणि परत आलाच नाही. तोमेश्वर हा पेशानं ड्रायव्हर आहे. तो एका लग्नाच्या वरातीत होता, त्याच दरम्यान त्याला पोलिसांचा फोन आला. पोलिसांना सकाळी 11 वाजता घेऊन जायचं असल्याचं त्याला सांगण्यात आलं. विचार करून त्यानं होकार कळवला, अशी माहिती सिंगनाथ याचा मोठा भाऊ हितेंद्र यांनी दिली आहे.नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवल्यानंतर लागलीच आम्ही घटनास्थळी पोहोचलो, असंही हितेंद्र यांनी सांगितलं आहे. हितेंद्र आणि त्याच्या वडिलांनी भाऊ तोमेश्वरची गाडी नक्षलवाद्यांनी उडवलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव रोखण्यात आलं. ते चित्र पाहिल्यानंतर हितेंद्रवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तो स्तब्ध झाला. त्यानंतर हितेंद्रच्या वडिलांनी तोमेश्वर सिंगनाथच्या मृतदेहाची ओळख पटवली.
तोमेश्वरचं लग्न झालं असून, त्याच्या पत्नीचं वय 22 वर्षं आहे. त्यांच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. तोमेश्वरचे वडील आणि भाऊ मजुरी करून पोट भरतात. तोमेश्वर हे वयाच्या 19व्या वर्षीपासून गाडी चालवतात. त्या रोडनं त्यानं बऱ्याच वेळा प्रवास केला होता. तोमेश्वरच्या जाण्यानं त्याची पत्नीसह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरकारनंही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.