गडचिरोलीच्या शेतकऱ्यांनी घेतली गुजरातच्या श्वेतक्रांतीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:03 PM2018-04-02T23:03:45+5:302018-04-02T23:03:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दूध उत्पादनासाठी पोषक वातावरण असूनही जिल्ह्यात दुधाचे उत्पादन घेतले जात नाही. दूध उत्पादनातून आर्थिक विकास करणे कसे शक्य आहे याची प्रात्यक्षिकासह माहिती जाणून घेण्यासाठी ‘आत्मा’च्या पुढाकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शैक्षणिक सहल थेट दुग्धोत्पादनातून श्वेतक्रांती घडविणाऱ्या गुजरातमध्ये नेण्यात आली.
जिल्ह्यातील पशुपालकांचे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन गुजरातमधील आणंद येथे ३० मार्च ते ५ एप्रिलदरम्यान करण्यात आले आहे. तेथील दूध व्यवसाय विकास मंडळाने पशुपालकांसाठी हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे. त्यात सहकार क्षेत्राद्वारे दूध व्यवसाय, पशुपालनासंदर्भातील तंत्रज्ञान, चारा पीके, जनावरांचे आजार, स्वच्छ दूध उत्पादन व दूधजन्य पदार्थांची निर्मिती या विषयांवर ३ दिवसांचा प्र्रशिक्षण कार्यक्रम ठेवला आहे.
खेडा जिल्ह्यातील सहकारी प्राथमिक दूध सोसायटीला भेट व दूध उत्पादकांशी चर्चा, प्रसिद्ध अमुल ब्रँडचे खेडा जिल्हा दूध उत्पादक संघ व त्यांच्या प्रक्रिया प्रकल्पाला सोमवारी (दि.२) प्रशिक्षणार्थींनी भेट दिली.
याप्रसंगी गडचिरोली येथील आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव, प्रशिक्षणार्थी डॉ.देवेंद्र मुनघाटे, प्रतिभा चौधरी, बाबुराव सारवे, प्रफुल्ल भांडेकर, गणेश ठाकरे, अनुराग भोयर असे ५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.