Gadchiroli: भामरागड येथे निवासी शाळेला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:59 PM2023-05-22T22:59:27+5:302023-05-22T22:59:58+5:30
Gadchiroli: भामरागड येथील जिल्हा परिषदेच्या समूह निवासी शाळेच्या जुन्या इमारतीला आचानक आग लागल्याची घटना २२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
- रमेश मारगोनवार
भामरागड (जि. गडचिरोली) : येथील जिल्हा परिषदेच्या समूह निवासी शाळेच्या जुन्या इमारतीला आचानक आग लागल्याची घटना २२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. या आगीत शाळेतील साहित्य जळून खाक झाले. आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यंत्रणेला यश आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
भामरागड येथील समूह निवासी शाळेच्या स्टोर रुममध्ये रात्री साडेनऊ वाजता अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला पसरत गेल्या. काही क्षणात आगीने संपूर्ण शाळेला कवेत घेतले. धुराचे लोळ व आगीच्या ज्वाला पाहून परिसरात एकच पळापळ झाली. सुट्या असल्याने शाळेत कोणीही नव्हते. आगीत गाद्या, ब्लॅंकेट, चादरी, फर्निचर व इतर साहित्य जळून भस्मसात झाले. नगरपंचायतच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीने तिथे पोहोचला. मुख्याधिकारी प्रकाश पुपलवार आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिकांनी देखील आग विझविण्यासाठी मदत केली.
कारण अस्पष्ट
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. जवळच निवासी वस्ती असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आग लागल्यावर स्थानिकांची धांदल उडाली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.