गडचिरोलीत वन विभागच साफ करणार मोहफुलाखालील पालापाचोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:19 AM2020-03-11T11:19:19+5:302020-03-11T11:20:54+5:30

मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

In Gadchiroli, the forest department will clean up the area | गडचिरोलीत वन विभागच साफ करणार मोहफुलाखालील पालापाचोळा

गडचिरोलीत वन विभागच साफ करणार मोहफुलाखालील पालापाचोळा

googlenewsNext
ठळक मुद्देआगीच्या घटनांवर नियंत्रणाचा प्रयत्न ८०० ब्लोअर मशिन खरेदी करणार

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमागे मोहफूल वेचण्यासाठी पालपाचोळा जळावा म्हणून लावलेला मानवनिर्मिती वणवा कारणीभूत असल्याचे वनविभागाच्या अभ्यासात लक्षात आले. त्यामुळे आता आगी लावून पालापाचोळा जाळण्याऐवजी मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात आणखी ८०० ब्लोअर मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७६ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २ लाख १३ हजार ७१५ मोहाची झाडे आहेत. मोहफुलापासून विविध पदार्थ तयार करता येत असल्याने मोहफुलांना चांगली किंमत मिळते. विशेष म्हणजे, मोहफुलासाठी कोणतेही अतिरिक्त श्रम किंवा गुंतवणूक करावी लागत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात मोहफूल वेचण्याकडे नागरिकांचा कल असतो. मोहफूल जमिनीवर पडत असल्याने ते वेचावे लागतात. त्यासाठी पालापाचोळा साफ करणे गरजेचे असते. प्रत्येक झाडाखालील कचरा साफ करणे शक्य नसल्यामुळे लोक मोहाच्या झाडाखालील कचºयाला आग लावतात. ही आग पुढे जंगलात पसरून त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. यात जंगल व जैवविविधतेचे मोठे नुकसान होते.
वन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक आगी मोहफूल वेचण्याच्या उद्देशाने लावण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये जंगलातील आगीच्या ११ हजार ७९६ घटनांची नोंद आहे. त्यामध्ये मोहफूल वेचण्यासाठी ६ हजार ७१८ आगी लागल्या आहेत.
आगीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी वनविभाग आता ब्लोअर मशिनच्या सहाय्याने मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा स्वच्छ करून देणार आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाकडे सध्या ६८२ ब्लोअर मशिन आहेत. यावर्षी पुन्हा ८०० मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.

झाडाखाली जाळी लावण्याचा प्रयोग फसला
आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील वर्षी वन विभागाने काही गावातील नागरिकांना जाळ्या वितरित केल्या होत्या. या जाळ्या जमिनीपासून जवळपास दोन फूट उंचीवर मोहाच्या झाडाखाली बांधल्या होत्या. दिवसभर पडलेले मोहफूल जाळीत जमा करून गोळा करावे लागत असे. त्यामुळे मोहफूल वेचण्याचीही गरज नव्हती. जाळीत मोहफूल पडल्याने स्वच्छ मोहफूल उपलब्ध होईल, हा सुध्दा उद्देश होता. मात्र बहुतांश नागरिकांनी जाळ्यांचा दुरूपयोग केला. तसेच जाळीमुळे एखाद्या वन्यजीवाचा जीव जाण्याचाही धोका होता. परिणामी जाळी वितरण यावर्षीपासून बंद करण्यात आले आहे.

Web Title: In Gadchiroli, the forest department will clean up the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.