गडचिरोलीच्या जंगलात यावर्षी ११ हजार वणव्यांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 07:59 PM2019-05-15T19:59:47+5:302019-05-15T19:59:53+5:30
राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी २० टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात यावर्षी तब्बल ११ हजार आगीच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे.
- मनोज ताजने
गडचिरोली : राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी २० टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात यावर्षी तब्बल ११ हजार आगीच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे. वनौपज गोळा करताना पालपाचोळा आणि सरपटणा-या प्राण्यांचा अडथळा दूर करण्यासाठी वनालगत राहणा-या नागरिकांकडून सदर आगी लावल्या जातात. आगींचे प्रमाण पाहता नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती कुचकामी ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १२ हजार ८६७ चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल पसरलेले आहे.
रोजगाराची साधनं नसल्यामुळे जंगलालगत राहणारे लोक उन्हाळ्यात तेंदूपाने, मोहफूल व इतर वनौपज गोळा करून त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह करतात. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी तेंदूपानांचा हंगाम जोमाने सुरू असतो. पेसा कायद्याने गावालगतच्या जंगलातील वनसंपत्तीवर हक्क मिळालेल्या ग्रामसभा तेंदूपाने खरेदी करून बाहेरील कंत्राटदारांना विकतात. यातून कोट्यवधीची उलाढाल होते. तेंदूपाने गोळा करणे सोपे जावे म्हणून उन्हाळ्यात खाली पडणारा झाडांचा पालापाचोळा जाळण्यासाठी आगी लावल्या जातात. ही आग पसरत जाऊन शेकडो किलोमीटरचा परिसर कवेत घेते.
अनेक वेळा शेतक-यांकडून धु-यावर लावलेली आग पसरत जाऊन जंगलात पसरते. या आगीत मोठ्या वृक्षांची फारशी हाणी होत नसली तरी रोपटे, प्राण्यांना जीव गमवावा लागतो. क्षेत्र मोठे आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे आगीचे नियंत्रण अनेक वेळा हाताबाहेर जात आहे.
फायर लाईन व जनजागृतीवर मोठा खर्च
जंगलात लावल्या जाणा-या आगी दूरपर्यंत न पसरता मर्यादित राहाव्यात यासाठी फायर ब्लोअरच्या मदतीने विशिष्ट रेषेत पालापाचोळा मोकळा करून फायर लाईन (जाळ रेषा) तयार केली जाते. त्यासाठी ७३५ वनक्षकांकडे फायर ब्लोअर हे यंत्र देण्यात आले आहे. त्यातून निघणा-या हवेच्या दाबाने पालापाचोळा साफ होऊन आग पसरण्यापासून रोखता येते. या यंत्राच्या वापरावर आणि आगी न लावण्याबाबत गावागावात जनजागृती करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्या तुलनेत आगीचे प्रमाण कमी करण्यात वनविभागाला अपेक्षित यश आलेले दिसत नाही.
सॅटेलाईट अलर्टमुळे अहोरात्र काम
आता जंगलात कुठेही आग लागल्यास सॅटेलाईट ती आग टिपून वन अधिकाºयांच्या मोबाईलवर सतत त्याचा संदेश येत असतो. त्यामुळे आग नेमकी कुठे लागली याची माहिती वनविभागाला लवकर मिळण्यास मदत होते. परंतू वनकर्मचारी तिथे पोहोचेपर्यंत आग बरीच पसरलेली असते. ज्या भागात आधीच फायर लाईन तयार केलेल्या आहेत त्या भागात आग मर्यादित स्वरूपात राहते.
कोट...
गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. इतर जिल्ह्यांत एका वनरक्षकाकडे ५०० ते ८०० हेक्टरचा परिसर असताना या जिल्ह्यात एका वनरक्षकाला ११०० ते ४५०० हेक्टरचा परिसर सांभाळावा लागतो. बीट लहान करून वनरक्षकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविला आहे.
- एस.एल. बिलोलीकर, उपवनसंरक्षक (दक्षता)