राज्यात कोरोनाचा सर्वात कमी मृत्यूदर गडचिरोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 08:27 PM2020-08-24T20:27:50+5:302020-08-24T20:30:51+5:30
राज्यभरात वैद्यकीय सेवेसह अनेक असुविधांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा गडचिरोली जिल्हा कोरोनासारख्या महामारीला हारवण्यात मात्र राज्यात आघाडीवर आहे.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यभरात वैद्यकीय सेवेसह अनेक असुविधांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा गडचिरोली जिल्हा कोरोनासारख्या महामारीला हारवण्यात मात्र राज्यात आघाडीवर आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत स्थानिक ५८५ आणि बाहेरच्या जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या ३०९ अशा एकूण ८९४ जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र त्यापैकी केवळ एका हृदयरुग्णाचा हैदराबाद येथे उपचार घेताना मृत्यू झाला. त्यामुळे या जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर राज्यात सर्वात कमी, अर्थात केवळ ०.१२ टक्के एवढा आहे.
गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या विदर्भातील पाच जिल्ह्यातही कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण राज्यात सर्वात कमी आहे. विशेष म्हणजे मोठमोठ्या शहरांसोबत राज्यातील सर्व जिल्ह्यांना कोरोनाने कवेत घेतले असताना १७ मे पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. १८ मे रोजी मुंबईवरून आलेल्या मजुरांपैकी ५ जण पहिल्यांदा पॉझिटिव्ह आले. त्यानंतरही जवळपास दीड महिना कोरोनाचा वेग मंदच होता. बाहेरून आलेल्या लोकांना थेट क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवून आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास तेथूनच रुग्णालयात नेले जात होते. प्रशासनाने त्याबाबत दिलेले दिशानिर्देश कोरोनाला रोखण्यासाठी फायद्याचे ठरले. जे पॉझिटिव्ह आले त्यांनाही गडचिरोलीतील शुद्ध हवेने १५ दिवसात पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह केले.
गडचिरोली जिल्ह्याला तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या आणि तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. रात्रंदिवस त्या सीमांवर पहारा देऊन येणाऱ्यांना रोखणे कठीण होते. पण ते आव्हान पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने पेलले. आजमितीस या जिल्ह्यातील १६०० गावांमध्ये एकही कोरोनारुग्ण आढळलेला नाही.
६० टक्के बाधित हे पोलीस जवान
नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बदलत असतात. नवीन तुकडी किंवा सुटीवरून परतलेल्या जवानांपैकी ५३९ जणांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी त्यांचे प्रमाण जवळपास ६० टक्के आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर त्या जवानांना काही दिवस जिल्ह्यात परतण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण पुन्हा कमी झाले आहे.
जंगलातील शुद्ध हवेचा परिणाम?
७६ टक्के जंगलाचा भूप्रदेश असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शुद्ध हवेचे प्रमाण जास्त आहे. त्यातच प्रदुषण पसरविणारे कोणतेही मोठे उद्योग नाही. सर्वात कमी मृत्यूदर असणारे राज्यातील पाच जिल्हे विदर्भातीलच असून त्या जिल्ह्यांमध्येही जंगल आहे. या जिल्ह्यांमधील नागरिकांना कोरोनाची बाधा कमी होण्यामागे किंवा झाली तरी ते लवकर बरे होण्यामागे त्यांना मिळणारा शुद्ध ऑक्सिजन हे एक कारण तर नाही ना? हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.