२६३ स्ट्रीटलाईटने प्रकाशणार गडचिरोली
By admin | Published: January 7, 2016 01:54 AM2016-01-07T01:54:32+5:302016-01-07T01:54:32+5:30
नगरोत्थान योजनेंतर्गत गडचिरोली शहरासाठी प्राप्त झालेल्या ९३ लाख रूपयांच्या निधीतून १६७ ठिकाणी नवीन खांब उभारले जाणार आहेत.
गडचिरोली : नगरोत्थान योजनेंतर्गत गडचिरोली शहरासाठी प्राप्त झालेल्या ९३ लाख रूपयांच्या निधीतून १६७ ठिकाणी नवीन खांब उभारले जाणार आहेत. या नवीन खांबांवर तसेच जुन्या ९६ खांबावर वायरिंग टाकली जाणार आहे. जुन्या व नव्या अशा एकूण २६३ खांबांवर स्ट्रीटलाईट लावले जाणार आहेत. त्यामुळे काही वॉर्डांमध्ये असलेली अंधाराची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
मागील १० वर्षात गडचिरोली शहराचा दुप्पटीने विस्तार झाला. शहराच्या सभोवताल अनेक नवीन वस्त्या तयार झाल्या. या वस्त्यांमध्ये हजारो लोक राहत आहेत. मोठमोठ्या इमारती तयार झाल्या आहेत. मात्र या ठिकाणी वीज पुरवठा झाला नाही. परिणामी स्थानिक नागरिकांना ३०० ते ४०० मीटरवरून वीज पुरवठा आणावा लागत होता. एवढ्या दूरून वीज पुरवठा आणत असताना दुप्पट खर्चासह धोकाही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिरोली शहराला प्राप्त झालेल्या नगरोत्थान योजनेच्या निधीतून वाढलेल्या वस्त्यांना वीज पुरवठा करण्याचा निर्णय नगर पालिकेने घेतला. नेमक्या कोणत्या ठिकाणी पथदिवे व नवीन खांब टाकण्याची गरज आहे. याबाबतचा सर्वे महावितरण कंपनीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी करण्यात आला. या सर्वेदरम्यान नवीन वस्त्यांमध्ये १६७ नवीन विद्युत खांब बसविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जुन्या ९६ विद्युत खांबांवर पथदिवे लावण्यात आले नाही. त्यामुळे या खांबावर पथदिवे लावण्यासाठी वायर टाकणे आवश्यक आहे, असा अहवाल नगर परिषदेकडे सादर करण्यात आला. या अहवालावरून नगर परिषदेने प्रस्ताव तयार केला. न. प. च्या मान्यतेनंतर सदर प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला. निविदा काढून विद्युत खांब उभारण्याच्या कामाला दोन दिवसांपासून सुरूवात झाली आहे. (नगर प्रतिनिधी)