गडचिरोलीत मोस्ट वाँटेड आरोपीने दिली पोलिसांच्या हातावर तुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 08:41 PM2020-06-26T20:41:12+5:302020-06-26T20:43:50+5:30
कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा ऊर्फ शबाना चौधरी प्रकरणातील मोस्ट वॉटेंड आरोपी राज मोहम्मद चौधरी हा मागील एक वर्षापासून पोलिसांना चकमा देत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील राजेंद्र वॉर्डात ब्युटी पार्लरच्या आड अत्यल्प किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा ऊर्फ शबाना चौधरी प्रकरणातील मोस्ट वॉटेंड आरोपी राज मोहम्मद चौधरी हा मागील एक वर्षापासून पोलिसांना चकमा देत आहे. या प्रकरणाच्या तपासाचा दुसरा टप्पा सुरू असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र त्याचा किंवा इतर आरोपींचा थांगपत्ता लावण्यात अद्याप तरी पोलिसांना यश आलेले नाही.
राज मोहम्मद हा पोलिसांच्या हाती लागल्यास त्याच्याकडून बºयाच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. देसाईगंज पोलिसांनी १८ जून २०१९ रोजी शिफाच्या राहत्या घरी धाड टाकून प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, अनेक आक्षेपार्ह दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले होते. दरम्यानच्या काळात आरोपी शिफा देसाईगंज शहरातून फरार झाली होती.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शिफा व तिचा भाचा निसार अहेमद चौधरी यांना उत्तरप्रदेशातून अटक केली होती. देसाईगंज पोलीस ठाण्यात या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. शिफा आणि तिचा भाचा निसार याला नागपूरच्या एमपीआयडी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना ६ जुलै २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची नागपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली.
सदर प्रकरणात १५ जणांच्या लेखी बयाणावरून १ कोटी ९२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते. परंतु अनेक गुंतवणूकदार पुढे आलेच नाही.
आरोपी राजच उलगडणार प्रकरणाचे ‘राज’
या प्रकरणात अटकेत असलेले दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असताना देसाईगंज व आरमोरीतील संशयित सहा जणांच्या घरांची झडती घेण्यात आली. सहा पैकी चार जणांकडून एमपीआयडी कायद्याअंतर्गत काही रक्कमही वसूल करण्यात आली. पण ती रक्कम अत्यल्प असल्याचे सांगितले जात आहे. राज चौधरी याला अटक केल्यास गुंतवणूकदारांकडून उर्वरित जमा रक्कम जप्त करणे, या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत काय, यासह इतर बाबींचा छडा लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे. मात्र आर्थिक फसवणूक झालेले गुंतवणूकदार केवळ दबक्या आवाजात चर्चा करीत आहेत.
आरोपी राज मोहम्मद याचा शोध कसून सुरू आहे. सदर आरोपीचा पत्ता ज्याला माहित असेल त्यांनी आम्हाला सांगावे, सांगणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. या प्रकरणात ज्यांचे पैसे अडकले त्यांचे बयाण घेण्यात आले आहे.
- उल्हास भुसारी,
पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली