'मोस्ट वाँटेड' नक्षलवादी नेता सुदर्शनचा हदयविकाराने मृत्यू
By संजय तिपाले | Published: June 5, 2023 12:03 PM2023-06-05T12:03:13+5:302023-06-05T12:04:29+5:30
पत्रकाद्वारे माओवाद्यांची माहिती: शासनाने जाहीर केले होते ८० लाखांचे बक्षीस
गडचिरोली : तब्बल पाच दशके नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहून एकदाही पोलिसांच्या हाती न लागलेला व शासनाने ८० लाख रुपयांचे बक्षीस ठेवलेला मोस्ट वाँटेड नक्षली नेता सुदर्शन कटकम (६९) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. माओवाद्यांनीच पत्रक काढून ही माहिती दिली.
सुदर्शन कटकम नक्षली चळवळीत कॉम्रेड आनंद म्हणून ओळखला जात असे. मूळचा बेल्लमपल्ली जि. आदिलाबाद, आंध्रप्रदेश येथील सुदर्शन १९७४ मध्ये खाणकाम पदविकेच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतानाच नक्षली चळवळीकडे ओढला गेला. १९७८ मध्ये लक्सेट्टीपेटा-जन्नारम इलाकामध्ये पक्ष समन्वय म्हणून तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय झाला. १९८० मध्ये आदिलाबाद जिल्हा समिती सचिव म्हणून काम करत त्याने १९८५ मध्ये दंडकारण्यात प्रेवश केला. त्याच्याकडे गडचिरोलीतील सिरोंचा पथकाचे नेतृत्व सोपवण्यात आले.
दंडकारण्यात पाठविलेल्या सात पथकापैकी ते एक होते. पुढे याचा विस्तार छातीसागडमधील बस्तरपर्यंत झाला. त्याने आदिलाबाद,गडचिरोली,बस्तर ते पूर्व गोदावरीपर्यंत विस्तारित ‘रिट्रीट झोन’ तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तो सीपीआय-एमएल पीपल्स वॉरच्या ‘वन संपर्क समिती’ सदस्य होता. १९९५ मध्ये त्याची नव्याने स्थापन झालेल्या ‘उत्तर तेलंगणा स्पेशल झोनल कमिटी’च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनतर ‘ऑल इंडिया स्पेशल कॉन्फरन्स’मध्ये केंद्रीय समितीवर निवड, तसेच २००१ आणि २००७ त्यांची केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून निवड झाली.
पोलिसांसोबत झालेल्या अनेक चकमकीत तो बचावला होता. नक्षल चळवळीचा विस्तार करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. मागील काही वर्षांपासून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या आजारांनी ग्रासले होते. अखेर ३१ मे रोजी त्याचा छत्तीसगडच्या जंगलात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. माओवादी संघटनेचे केंद्रीय समिती प्रवक्ता अभय याने पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
भूमिगत राहून आखल्या व्यूहरचना
नक्षली चळवळीच्या कठीण प्रसंगात सुदर्शन कटकमने विविध व्यूहरचना आखत पोलिसांना आव्हान दिले. २००१ ते २०१७ पर्यंत रिजनल ब्युरो (सीआरबी) सचिवपदाच्या जबादारी त्याने सांभाळली, २०१७ नंतर तो स्वेच्छेने यातून मुक्त झाला. पुढे पोलिस ब्युरो सदस्य म्हणून तो नक्षली चळवळीसाठी काम करत होता. केंद्रीय कमिटी मीडिया प्रवक्ता म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधण्याची पद्धत सुद्धा त्यानेच सुरू केली.