गडचिरोलीत नक्षल्यांकडून दोघांची हत्या; दुर्गम भागांमध्ये परसरले भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 11:51 PM2019-12-02T23:51:55+5:302019-12-02T23:52:05+5:30
रविवारी रात्री ७० हून अधिक नक्षलवाद्यांनी गावाला घेराव घातला
एटापल्ली/कमलापूर (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरसलगोंदी येथील दोन गावकऱ्यांची रविवारच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तसेच नक्षलवाद्यांनी कमलापूर हत्ती कॅम्पमध्येही तोडफोड केली.
पिपल लिबरेशन गोरिला आर्मी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हे घडल्याने दुर्गम भागात भीतीचे वातावरण आहे. मासो डेबला पुंगाटी व ऋषी लालू मेश्राम अशी हत्या झालेल्या शेतकºयांची नावे आहेत. मासो हा पुरसलगोंदी येथील गाव पाटील आहे तर ऋषी हा कृषीमित्र म्हणून गावात काम करीत होता.
रविवारी रात्री ७० हून अधिक नक्षलवाद्यांनी गावाला घेराव घातला आणि दोघांनाही झोपेतून उठवून दोघांचेही हात बांधले. त्यांच्या घरातील कागदपत्रे व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकले. दोघांच्याही कुटुंबीयांनी प्रचंड विरोध केला. मात्र त्यांना घरात कोंडून ठेवले. मारहाण करीतच त्यांना गावाबाहेर नेले. त्यानंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह आढळले. जवळच एक चिठ्ठी होती.
या दोघांनी सुरजागड लोहप्रकल्पासाठी पैसे घेतले व ते त्या कामावर जात होते, ते पोलिसांचे खबरी होते, असा आरोप चिठ्ठीत आहे. पण मासो पुंगाटी नक्षलसमर्थक असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. कमलापूर येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पच्या परिसरातही नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालून, तोडफोड केली. या भागात १० हत्तींचे वास्तव्य आहे.
अनेक नक्षली नेते आणि दलम सदस्य पोलिसांपुढे आत्मसमर्पण करत आहेत. यातून आलेल्या नैराश्यातून नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. आदिवासींचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न नक्षलवादी करत आहेत. त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही.
- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक