गडचिरोली: गावकऱ्यांनी जाळले नक्षली बॅनर, माओवादाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 07:40 PM2018-03-23T19:40:21+5:302018-03-23T19:40:21+5:30
नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मार्चदरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ पाळण्याचे बॅनर व पत्रकातून केलेले आवाहन गावकऱ्यांनी झुगारत नक्षली बॅनर जाळले
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मार्चदरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ पाळण्याचे बॅनर व पत्रकातून केलेले आवाहन गावकऱ्यांनी झुगारत नक्षली बॅनर जाळले. ही घटना शुक्रवारी अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या पेरमिली ते आलापल्ली मार्गावरील ३ किलोमीटरवर असलेल्या आरेंदा फाट्यावर घडली.
या परिसरात नक्षल्यांनी ३ बॅनर लावले होते. आरेंदा येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन ते बॅनर काढले आणि जाळले. यादरम्यान गावकऱ्यांनी माओवादाचा निषेध करत आपण माओवाद्यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. माओवादी आपल्या भागातील विकास कामांना आडकाठी आणत आपली प्रगती होऊ देत नसल्याचे आमच्या लक्षात आल्याने येथुन पुढे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा निर्धार ५० पेक्षा जास्त गावकऱ्यांनी व्यक्त केला.
अनेक वर्षांपासून आपणच आदिवासी समाजातील लोकांच्या विकासासाठी झटत आहोत असे भासवून आपलाच फायदा पाहणाºया आणि गरीब आदिवासी जनतेच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीत आडकाठी बनून विकासास बाधक ठरणाऱ्या नक्षलवाद्यांच्या विरोधात आरेंदातील गावकºयांनी एल्गार पुकारला आहे. आठवडाभरापूर्वी भामरागड उपविभाग हद्दीतील ४ गावांतील गावकºयांनी एकत्र येत अशाच प्रकारे निषेध नोंदवत नक्षलींनी बांधलेले स्मारक उद्ध्वस्त केले होते.