वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावात गडचिरोलीचा समावेश नाही
By admin | Published: November 6, 2014 10:54 PM2014-11-06T22:54:47+5:302014-11-06T22:54:47+5:30
आगामी शैक्षणिक वर्षात नवीन वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमीओपॅथी, फिजिओथेरपी आणि बी.एस्सी नर्सींग महाविद्यालय सुरू करण्यासाठी २९ प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे दाखल झाले आहे.
गडचिरोली : आगामी शैक्षणिक वर्षात नवीन वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमीओपॅथी, फिजिओथेरपी आणि बी.एस्सी नर्सींग महाविद्यालय सुरू करण्यासाठी २९ प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे दाखल झाले आहे. मात्र या प्रस्तावात मागास गडचिरोली जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती पुढे आली आहे.
सध्या आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत बृहत आराखड्यानुसार वैद्यकीय शिक्षणाचे संपूर्ण राज्यात समन्यायी वाटप होण्याकरीता नियोजन तयार केले जात आहे. ३१ आॅक्टोबरपूर्वी असे प्रस्ताव विद्यापीठ दरवर्षी मागत असते. यंदा राज्यातून नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी २९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यामध्ये पाच प्रस्ताव हे नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठीचे आहे. यामध्ये पालघर, रायगड, नांदेड, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दंत महाविद्यालयासाठी सांगली येथून एक प्रस्ताव आला आहे. आयुर्वेद विद्या शाखेसाठी बुलढाणा, सांगली, बीड जालना, कोल्हापूर तर होमीओपॅथीसाठी दोन प्रस्ताव आलेले आहे. ते नांदेड व सांगलीचे आहे. तसेच फिजिओथेरपीसाठी एकूण ६ प्रस्ताव आरोग्य विद्यापीठाकडे आहेत. यामध्ये सांगली, पुणे, ठाणे, औरंगाबाद, बुलढाणा, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक येथील प्रस्तावाचा समावेश आहे. पूर्वविदर्भात गडचिरोली हा अतिमागास जिल्हा आहे. येथे आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नाही. साधा पोलीस जवान चकमकीदरम्यान जखमी झाला. तरी त्याला नागपूर येथे खासगी रूग्णालयात तातडीने न्यावे लागते. गडचिरोलीत जिल्हासामान्य रूग्णालयामध्ये २०० खाटांची मंजुरी आहे. तर शहरातच महिला व बाल रूग्णालय नव्याने तयार होत आहे. येथेही २०० खाटांची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर सध्या तयार आहे.
महाविद्यालयासाठी लागणारी जागाही येथे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे राज्य शासनाने स्वत: गडचिरोलीला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यावा व जिल्ह्याचा प्रस्ताव तयार करून येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी जिल्हावासीयांची मागणी आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी आता वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)