गडचिरोली-पाखांजूर बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:53 PM2019-02-26T23:53:36+5:302019-02-26T23:54:47+5:30
गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यातील पाखांजूर गावापर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना होणार आहे. सदर बस गडचिरोली-चातगाव-कारवाफा-गट्टा-पेंढरी-बोटेहूर-छत्तीसगड राज्यातील मायाकूर-पाखांजूरपर्यंत जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यातील पाखांजूर गावापर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना होणार आहे.
सदर बस गडचिरोली-चातगाव-कारवाफा-गट्टा-पेंढरी-बोटेहूर-छत्तीसगड राज्यातील मायाकूर-पाखांजूरपर्यंत जाणार आहे. या मार्गावर खासगी प्रवाशी वाहने अत्यंत कमी आहेत. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांची फार मोठी गैरसोय होत होती. जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार यांच्या नेतृत्त्वात गाव गणराज्य परिषद व तालुका निर्माण कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बससेवा सुरू झाली आहे. पेंढरी येथे बस पोहोचल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी चालक व वाहक यांचा सत्कार केला.
ही बस सकाळी ७ वाजता गडचिरोलीवरून सुटेल व ९ वाजता पाखांजूर येथे पोहोचेल. सकाळी ९.१५ वाजता पाखांजूर वरून निघून ११.१५ वाजता गडचिरोली येथे पोहोचेल. पुन्हा दुपारी २ वाजता गडचिरोलीवरून हीच बस पाखांजूरसाठी सोडली जाईल. पाखांजूर वरून ४.१५ वाजता निघेल व गडचिरोली येथे ६.१५ वाजता पोहोचेल. या बसमुळे चातगाव ते पेंढरीपर्यत असलेल्या अनेक गावातील प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे.
पेढरी परिसरातील एकूण ७० मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. गडचिरोली ते पाखांजूर ही बससेवा सुरू करावी ही त्यातील एक मागणी आहे. आंदोलनानंतर ही बस सुरू करण्यात आली आहे. इतरही मागण्या सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी लोकमतशी बोलतांना केली आहे.