गडचिरोली टू पिपली (बुर्गी) व्हाया छत्तीसगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:30 AM2021-07-25T04:30:59+5:302021-07-25T04:30:59+5:30
एटापल्ली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा एटापल्लीच्या दुर्गम भागातील दौरा समस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन ...
एटापल्ली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा एटापल्लीच्या दुर्गम भागातील दौरा समस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन धडा देणारा ठरला. पिपली (बुर्गी) सारख्या शेवटच्या टोकावरील गावाला जाण्यासाठी सीईओंना चक्क छत्तीसगड राज्याच्या सीमेतील इरपनार या गावातून जावे लागले. नदीतून आणि पायी चालत जाऊन त्यांनी जाणून घेतलेल्या समस्यांमुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पिपली (बुर्गी) हे एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगत आहे. अजूनही हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. या गावाचा संपर्क महाराष्ट्रापेक्षा छत्तीसगड राज्यातच जास्त असतो. या गावाला पोहोचण्यासाठी तालुक्यातून मार्ग नसल्याने छत्तीसगड राज्यातील इरपनार गावातून जावे लागते. सीईओ आशीर्वाद दुपारी जारावंडी, भापडा या गावावरून इरपनारमार्गे पिपली (बुर्गी)ला पोहोचले. तिथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कामाची त्यांनी पाहणी केली. तसेच गावातील नागरिकांशी संवाद साधला व आरोग्य सुविधांची माहिती घेतली. कोरोनाची लस घेण्याचेही आवाहन केले.
यावेळी सीईओंसोबत सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विनोद म्हशाखेत्री होते. कसनसूरचे वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अस्तिता देवगडे गृहविलगीकरणात असल्याने त्या भ्रमणध्वनीच्या माध्यमाने संपर्कात होत्या.
(बॉक्स)
अडीच ते तीन किलोमीटरचा पायी प्रवास
पिपली बुर्गी गावातून परतीच्या वेळी सेवारीमार्गे सीईओ कसनसूरला आले. यावेळी त्यांना अडीत ते तीन किलोमीटर पायी चालावे लागले. तसेच सेवारी गावाजवळील बांदे नदीपात्रातील पाण्यातून पायी वाट काढावी लागली. नदीत पाणी पातळी जास्त असती तर नावेने (डोंग्यातून) पैलतीर गाठावे लागले असते.
(बॉक्स)
दौरा सार्थकी लागेल का?
पावसाळ्यात या गावांचा कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रासोबत संपर्क तुटतो. या काळात गरोदर मातांच्या सुरक्षित प्रसूती कशी होते, याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी येणाऱ्या अडचणीही सीईओंनी जाणून घेतल्या. आता या भागातील समस्या दूर होणार का आणि कधीपर्यंत दूर होणार? असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष न करता हा दौरा सार्थकी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.