गडचिराेली पाेलीस दादालाेरा खिडकीला 2021 सालचा 'फिक्की'चा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 11:52 PM2022-09-03T23:52:22+5:302022-09-03T23:52:46+5:30
दिल्ली येथे सन्मानित, साामाजिक उपक्रमांची दखल
गडचिराेली: भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघच्या वतीने देण्यात येणारा ‘फिक्की स्मार्ट पोलिसींग पुरस्कार २०२१’ हा पुरस्कार गडचिरोली दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीला मिळाला आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यावतीने सहायक पाेलीस निरिक्षक महादेव शेलार यांनी हा पुरस्कार २ सप्टेंबर राेजी दिल्ली येथे आयाेजीत कार्यक्रमात स्विकारला.
पुरस्कार वितरण साेहळ्याला माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई आणि युपीचे माजी डीजीपी प्रकाश सिंग यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कम्युनिटी पाेलिसिंग या श्रेणीतून गडचिरोली पोलीस दलाला पुरस्कार मिळाला.
गरीब नागरिकांसाठी शासनामार्फत विविध याेजना राबविल्या जातात. गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ९९ टक्के जनता या याेजनांसाठी पात्र ठरते. मात्र अनेकांकडे दाखले राहत नाही. किंवा तालुकास्थळी जाऊन याेजनेसाठी अर्ज करणे शक्य हाेत नाही. अशा परिस्थिती गडचिराेली पाेलीस दलाने जिल्हा पाेलीस अधिक्षक अंकित गाेयल यांच्या संकल्पनेतून ‘पाेलीस दादालाेरा खिडकी’(पाेलीस दादाची खिडकी) हा उपक्रम राबविला. उघड्या खिडकीप्रमाणे पाेलीस मदतीसाठी कधीही तयार तयार राहतील या अर्थाने खिडकी हे नाव याेजनेला देण्यात आले. या याेजनेच्या माध्यमातून जिल्हाभरातील पाेलीस स्टेशनमध्ये विविध मेळावे घेऊन दुर्गम भागातील नागरिकांना याेजनांची माहिती देण्यात आली. याेजनेसाठी दाखले काढून देण्यात आले. तसेच याेजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले. नागरिकांचे संरक्षण करण्याबराेबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही गडचिराेली पाेलिसांनी प्रयत्न केले. गडचिराेली पाेलीस दलाच्या या कार्याची दखल घेऊन फिक्कीने पुरस्कार दिला. जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी या पुरस्काराचे श्रेय सर्व पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे.
२ लाख १४ हजार ५३८ नागरिकांना लाभ
जिल्ह्यातील ५३ पाेलीस स्टेशन, उपपाेलीस स्टेशन व पाेलीस मदत केंद्रात 'पोलीस दादालोरा खिडकी' सुरू केल्या आहेत. या याेजनेच्या माध्यमातून २ लाख १४ हजार ५३८ नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यात ९ हजार २६ जणांना जात प्रमाणपत्र, १ लाख २० हजार ७०५ नागरिकांना विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून दिले. ५५ हजार ३२० नागरिकांना विविध याेजनांचा लाभ, ५ हजार ६४१ जणांना व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार आदी लाभ मिळवून दिले आहेत.