Gadchiroli | अहेरीच्या जंगलात पोलीस-नक्षल्यांमध्ये चकमक; परिसरात शोधमोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 10:38 AM2022-09-30T10:38:57+5:302022-09-30T10:39:37+5:30
नक्षल्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणि गुरुवारी सकाळी चकमक उडाली.
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येणाऱ्या दामरंचा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोपेवंचा जंगलात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणि गुरुवारी सकाळी चकमक उडाली. पोलिसांच्या बाजूने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, सी-६० पथकाकडून त्या भागातील जंगलात गुरुवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू असल्यामुळे पोलिसांनी नक्षल्यांवर चढाई करण्यात यश मिळविल्याची चर्चा आहे.
नक्षल्यांचा विलय सप्ताह दि.२७ ला संपला. यात कोणताही घातपात घडविण्यात नक्षल्यांना यश आले नाही. दरम्यान नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकाला जंगलात नक्षली कॅम्प लावल्याची कुणकुण लागल्याने बुधवारी सी-६० कमांडोंनी तिकडे मोर्चा वळविला.
पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच नक्षल्यांनी गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही गोळीबार करत नक्षलवाद्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण रात्रीच्या अंधारात नक्षली पसार झाले. गुरुवारी पहाटे पोलीस पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. यावेळीही नक्षल्यांसोबत त्यांची चकमक उडाल्याचे समजते.
विशेष म्हणजे संध्याकाळपर्यंत नक्षलविरोधी अभियान राबविणारे पथक परतले नव्हते. त्यामुळे जंगलात बऱ्याच आतमध्ये जाऊन त्यांनी नक्षलींवर चढाई केली असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हे पथक परतल्यानंतरच त्याबद्दल ठोस काही सांगता येईल, असे पोलीस सूत्राने स्पष्ट केले.