गडचिरोलीत हातभट्टीच्या दारूअड्ड्यावर धाड, ६.५५ लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 03:57 PM2020-04-18T15:57:28+5:302020-04-18T15:59:52+5:30
सध्या विदेशी दारूचा पुरवठा करणे अशक्य होत असल्यामुळे मद्यशौकिन हातभट्टीच्या दारूवर आपली तलफ भागवत आहेत. त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात मोहा दारू काढणाऱ्यांच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सध्या विदेशी दारूचा पुरवठा करणे अशक्य होत असल्यामुळे मद्यशौकिन हातभट्टीच्या दारूवर आपली तलफ भागवत आहेत. त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात मोहा दारू काढणाऱ्यांच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकली. या कारवाईत दारू, मोहफुलाचा सडवा आणि हातभट्टीचे साहित्य असा ६ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करून दारू व सडवा नाल्यात रिचवला.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील गुंडापल्ली येथील दारू तस्कर नेपाल हजारी मिस्त्री आणि त्याचे वडील हजारी मिस्त्री यांच्यासह इतर दोन अनोळखी इसम अवैधपणे मोहा दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांच्या आदेशान्वये आणि पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुंडापल्ली गावाच्या जंगल शिवारातील तुंबडी नाल्याच्या काठाने शोध घेतला.
यावेळी तिथे ५० लिटर क्षमतेच्या ५ प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली मोहा दारू, ११ मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये भरलेला मोहा सडवा आणि १४ लहान ड्रममध्ये भरलेला मोहा सडवा तसेच एक दुचाकी वाहन असा एकूण ६ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. मोहा दारू आणि सडवा लगतच्या नाल्यात ओतून नष्ट करण्यात आला. इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या येण्याची चाहूल लागल्याने आरोपी घनदाट जंगलात आधीच पसार झाले.
ही कारवाई सहायक फौजदार दादाजी करकाडे, हवालदार निळकंठ पेंदाम, महिला पोलीस नायक पुष्पा कन्नाके, सुनील पुठ्ठावार, शुक्राचार्य गवळी, चालक ईश्वर पेंदाम आदींनी केली.
लॉकडाऊनमुळे मोहा दारूला मागणी
लॉकडाऊन आणि आंतरजिल्हा सीमाबंदी कडक केल्यामुळे कोणत्याच मार्गाने विदेशी दारूची आयात करणे मद्यतस्करांना अशक्य झाले आहे. परिणामी मोहा दारूची मागणी वाढली आहे. ही गरज भागविण्यासाठी जंगलालगतच्या भागात हातभट्टीची दारू गाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर सोपविली आहे.