गडचिरोलीत तिसऱ्याही दिवशी पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 07:04 PM2022-07-11T19:04:33+5:302022-07-11T19:05:18+5:30
Gadchiroli News तीन दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गडचिराेली : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १२ जुलैदरम्यान रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा अंदाज खरा ठरत रात्रीपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस काेसळत हाेता. अगाेदरच ओसंडून वाहणाऱ्या नदीनाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली. संजय सराेवर, गाेसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. गाेदावरी, प्राणहिता व वर्धा नदीसुद्धा उफाळून वाहत आहे. माेठ्या नद्या उफाळून वाहत असल्याने या नद्यांना लागून असलेल्या लहान नद्या व नाल्यांना दाब निर्माण झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली.
काँग्रेसतर्फे मदत केंद्र
पुरामुळे जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य वाहून जाते. अशावेळी त्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागू नये, यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणार आहे. मदतीकरिता नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अनुप कोहळे यांच्याशी संपर्क साधावा. गडचिराेली तालुक्यातील नागरिकांनी रजनीकांत मोटघरे, गौरव एनपरेड्डीवार, मयूर गावतुरे, सिराेंचा तालुक्यातील आकाश परसा, एटापल्ली तालुक्यातील मोहन नामेवार, निजान पेंदाम, भामरागड तालुक्यातील लक्ष्मीकांत बोगामी, अहेरी तालुका - पप्पू हकीम, रज्जाक पठाण, मूलचेरा तालुका - रवींद्र शहा, गोपाल कविराज, चामोर्शी तालुका - प्रमोद भगत, वैभव भिवापुरे, धानोरा तालुका - ललित बरचा, प्रशांत कोराम, आरमोरी तालुका - मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, देसाईगंज तालुका - राजेंद्र बुल्ले, पिंकू बावणे, कुरखेडा तालुका - जीवन पा. नाट, शोएब मस्तान तसेच कोरची तालुक्यातील मनोज अग्रवाल यांच्याशी संपर्क करावा.
सिराेंचा, भामरागड मार्ग झाले खुले
आलापल्ली-भामरागड नाल्यावरील पेरमिली नाला, कुमरगुडा नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग रविवारी बंद हाेते. मात्र साेमवारी हे मार्ग सुरू झाले आहेत. या दाेन्ही नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. आलापल्ली-सिराेंचा मार्गसुद्धा माेकळा झाला आहे.
३५ घरे पडली
अहेरी, एटापल्ली, सिराेंचा या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक जिवित व वित्त हानी झाली आहे. या तालुक्यातील ३५ घरांची पडझड झाली आहे. १२ माेठी जनावरे वाहून गेली आहेत.