गडचिरोलीवासीयांनी जाणला लालपरीचा संघर्षमय इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:38 PM2019-08-16T23:38:02+5:302019-08-16T23:38:34+5:30
राज्यातील नागरिकांच्या वातुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसटीने अनेक स्थित्यंतरे व संघर्ष करीत आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एसटीने आपुलकी निर्माण केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील नागरिकांच्या वातुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसटीने अनेक स्थित्यंतरे व संघर्ष करीत आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एसटीने आपुलकी निर्माण केली आहे. एसटीचा इतिहास राज्यभरातील जनतेला कळावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व बस फॉर अस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी लालपरीची’ हा चित्ररथ तयार केला. सदर चित्ररथ महाराष्ट्रभर फिरत आहे. हा चित्ररथ गडचिरोली येथे १४ आॅगस्ट रोजी दाखल झाला. १६ आॅगस्ट रोजी चित्ररथाचे प्रदर्शन विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी ठेवण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसटीचे विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, सांख्यिकी अधिकारी गौरखेडे, सुरक्षा अधिकारी कानफाडे, आगार प्रमुख मंगेश पांडे, बँक संचालक लक्ष्मीकांत चौधरी, रवी बुरले, किशोर लिंगलवार, विलास भुरसे, सुनील खोब्रागडे, विनोद धकाते, जयप्रकाश तनगुलवार, विवेक फाये, रोहिनी पुन्नमवार, सोनी फाये, लता जोगे, माधुरी चिताडे, सरीता सराफ, पवन बासनवार, जे. टी. खोब्रागडे, एम. ए. राठोड, किशोर वानखेडे उपस्थित होते.१९४८ साली पुणे ते अहमदनगर मार्गावर पहिली बस धावली. हळूहळू एसटीचा महामंडळाचा विस्तार वाढत जाऊन संपूर्ण राज्यात विस्तार झाला. एसटी बसगाड्यांमध्ये झालेल्या बदलांची माहिती व प्रतिकृती प्रदर्शनात ठेवल्या होत्या. बस फॉर अस फाऊंडेशनचे रोहित धेंडे, रवी मडगे, सुमेध देशभ्रतार, संयम धाक, सुशांत अवसरे, संजय शिंगाने हजर होते. शेकडो विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लालपरीचा इतिहास जाणून घेतला.
लोकबिरादरीत समारोप
‘वारी लालपरीची’ प्रदर्शनाला १ जून २०१९ रोजी मुंबई येथून सुरूवात झाली. राज्यातील ५० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा चित्ररथ फिरला. राज्याच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात प्रदर्शनाचा समरोप होणार आहे.