वाघाच्या हल्ल्याने गडचिरोलीवासीय धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:00 AM2020-12-17T05:00:00+5:302020-12-17T05:00:24+5:30
गडचिराेली शहराच्या चामाेर्शी, धानाेरा, चांदाळा, पाेटेगाव मार्गाला लागून जंगल आहे. जंगलामुळे या भागात सकाळी आल्हाददायक वातावरण राहात असल्याने मन व शरीराचा थकवा दूर हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे अनेक नागरिक या मार्गांवर फिरायला जातात. मागील वर्षभरापासून धानाेरा ते चामाेर्शी मार्गाला जाेडून असलेल्या जंगलात वाघ व बिबटे नागरिकांना दिसून येत हाेते. मात्र आजपर्यंत गडचिराेली शहरातील एकाही व्यक्तीवर वाघाने तसेच बिबट्याने हल्ला केला नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : चामाेर्शी, धानाेरा, चांदाळा, पाेटेगाव मार्गावर फिरायला जाणाऱ्यांना आजपर्यंत वाघ व बिबट्याचे दर्शन हाेत हाेते. मात्र बुधवारी गडचिराेली शहरापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या चांदाळा मार्गावर इंदिरानगरातील महिलेवर भरदुपारी हल्ला करून वाघाने ठार केले. प्रथमच शहराच्या एवढ्या जवळ वाघ पोहोचल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ज्या भागात वाघाने महिलेवर हल्ला केला त्या भागात सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यात आता धास्त पसरली आहे.
गडचिराेली शहराच्या चामाेर्शी, धानाेरा, चांदाळा, पाेटेगाव मार्गाला लागून जंगल आहे. जंगलामुळे या भागात सकाळी आल्हाददायक वातावरण राहात असल्याने मन व शरीराचा थकवा दूर हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे अनेक नागरिक या मार्गांवर फिरायला जातात. मागील वर्षभरापासून धानाेरा ते चामाेर्शी मार्गाला जाेडून असलेल्या जंगलात वाघ व बिबटे नागरिकांना दिसून येत हाेते. मात्र आजपर्यंत गडचिराेली शहरातील एकाही व्यक्तीवर वाघाने तसेच बिबट्याने हल्ला केला नव्हता. त्यामुळे धाेका असतानाही अनेक नागरिक या मार्गांवर फिरण्यासाठी जात हाेते. बुधवारच्या घटनेने मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील इंदिरानगर, स्नेहनगर, विवेकानंदनगर, गाेकुलनगर, रामनगरापासून जंगल काही दूर अंतरावर आहे. भविष्यात वाघ व बिबटे शहरात शिरून नागरिकांवर हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्यासह इंदिरानगरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. हे प्रकरण वनविभागाने अतिशय गंभीरतेने घेण्याची गरज आहे. अन्यथा नागरिकांच्या जीवाला धाेका आहे.
‘वाघाचा बंदोबस्त करण्याचे खासदारांचे निर्देश
गडचिरोली शहरानजिक वाघाच्या हल्ल्यात कोणी व्यक्ती ठार होण्याची घटना प्रथमच घडली. याबाबतची माहिती मिळताच खासदार अशोक नेते यांनी मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती जाणून घेतली. त्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा, असे निर्देश त्यांनी दिले. इंदिरानगर, चांदाळा रोड, पोटेगाव रोड, सेमाना देवस्थानच्या जंगल परिसरात पिंजरे लावून वाघाला जेरबंद करावे, तसेच हल्ल्यात मृत महिला सुधा चिलमवार यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशीही सूचना खा.नेते यांनी केली.