Gadchiroli: गडचिरोलीच्या श्रावणबाळाने वडिलांसाठी खाटेची कावड करून पुरामधून केली १८ किमी पायपीट

By संजय तिपाले | Published: July 26, 2024 09:59 PM2024-07-26T21:59:15+5:302024-07-26T22:00:27+5:30

Gadchiroli News: दुर्गम, अतिदुर्गम भागात नावेतून, कावडीतून रुग्णांचा दवाखान्यापर्यंतचा प्रवास नवीन नाही, पण २६ जुलैला भटपार गावी जखमी पित्यासाठी पुत्राने दाखवलेली हिंमत चर्चेचा विषय ठरली.

Gadchiroli: Shravanbal of Gadchiroli walked 18 km by making a cot for his father. | Gadchiroli: गडचिरोलीच्या श्रावणबाळाने वडिलांसाठी खाटेची कावड करून पुरामधून केली १८ किमी पायपीट

Gadchiroli: गडचिरोलीच्या श्रावणबाळाने वडिलांसाठी खाटेची कावड करून पुरामधून केली १८ किमी पायपीट

- संजय तिपाले

 गडचिरोली - दुर्गम, अतिदुर्गम भागात नावेतून, कावडीतून रुग्णांचा दवाखान्यापर्यंतचा प्रवास नवीन नाही, पण २६ जुलैला भटपार गावी जखमी पित्यासाठी पुत्राने दाखवलेली हिंमत चर्चेचा विषय ठरली. शेतीकाम करताना पायाला घसरुन पडल्याने जायबंदी झालेल्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करुन चिखलात तब्बल १८ किलोमीटर पायपीट केली. वाटेत नदी तुडूंब भरलेली होती, पण पितृप्रेमही ओसंडून वाहत होते, त्यामुळे नावेतून नदी पार केल्यानंतर दवाखाना गाठला.

मालू केये मज्जी (६७,रा. भटपार ता. भामरागड) असे जखमी पित्याचे नाव आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका भामरागड या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गावाला बसला. पर्लकोटा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेलाच आहे. तालुक्यातील घनदाट जंगलातील दुर्गम, अतिदुर्गम गावातील स्थितीही याहून वेगळी नाही. दरम्यान, मालू मज्जी हे २६ जुलै रोेजी नित्याप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. चिखलात पाय घसरुन पडल्याने दुखापत झाली. त्यामुळे त्यांचे चालणे, फिरणेही कठीण झाले. वेदनेने विव्हळणाऱ्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी भटपारपासून १८ किलोमीटर अंतरावरील भामरागडला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाहन नव्हते, चिखलात पायपीट करणे हाच मार्ग होता. त्यामुळे त्यांचा मुलगा पुसू मालू मज्जी याने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड केली व मालू यांना त्यावर झोपवून भामरागडला निघाला.

चिखल तुडवत पुसू मालू व त्याचे तीन ते चार मित्र पामुलगौतम नदीतिरी पोहोचले. नदी तुडूंब भरुन वाहत होती, पण पुसू मालू व त्याच्या मित्रांनी हिंमत न हारता नावेत खाट टाकून नदी पार केली. तेथून पुन्हा खाटेवरुनच त्यांनी मालू यांना मज्जी यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली, त्यानंतर एक्सरे काढला. यात त्यांचा पाय फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. या प्रसंगानंतर पुत्रप्रेमाची तर चर्चा झालीच, पण अतिदुर्गम भागात पुरामुळे रुग्णांचे कसे हाल होत आहेत, हे देखील यामुळे चव्हाट्यावर आले.
 
तात्पुरत्या उपचारानंतर खाटेवरुनच माघारी
मालू मज्जी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, गडचिरोलीचा संपर्क तुटलेला असल्याने मुलगा पुसू मालू मज्जी हा निराश झाला. तात्पुरत्या उपचारानंतर वडिलांना घेऊन तो पुन्हा खाटेची कावड करुनच जड पावलांनी भटपार येथे घरी परतला.

Web Title: Gadchiroli: Shravanbal of Gadchiroli walked 18 km by making a cot for his father.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.