शस्त्र चालवणाऱ्या हाती संविधान; जहाल माओवादी नेता गिरीधरचे सपत्नीक आत्मसमर्पण
By संजय तिपाले | Published: June 22, 2024 08:52 PM2024-06-22T20:52:36+5:302024-06-22T20:54:09+5:30
२८ वर्षांत १७९ गुन्हे; दाम्पत्यावर होते ५२ लाख रुपयांचे बक्षीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षली चळवळीची व्यूहरचना ज्याच्या इशाऱ्यावर चालायची तो जहाल नेता नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चू याने पत्नी संगीता समवेत २२ जून रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. नक्षल चळवळीत दलम सदस्य ते नक्षल नेता या २८ वर्षांच्या हिंसक प्रवासाला पूर्णविराम देत हाती संविधान घेऊन त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्याच्यावर तब्बल १७९ गुन्हे नोंद असून दाम्पत्यावर मिळून शासनाने ४२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चू याने आत्मसमर्पण केल्याने माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
९ जुलै १९९६ मध्ये एटापल्ली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन त्याने नक्षल चळवळीत पदार्पण केले. डिसेंबर १९९७ मध्ये एटापल्ली दलममध्ये पार्टी मेंबर म्हणून त्यास बढती मिळाली. जानेवारी १९९८ मध्ये केंद्रीय समिती सदस्या सोनू याचा अंगरक्षक म्हणून काम केले. २००२ मध्येभामरागड दलममध्ये कमांडर, २००६ मध्ये डीव्हीसीएम पदावर बढती व त्यानंतर कंपनी क्र. ०४ मध्ये उप-कमांडर, फेब्रुवारी २००९ मध्ये कंपनी नं ०४ मध्ये कमांडर , मार्च २०१३ मध्ये कंपनी पार्टी कमिटी सचिव पदावर त्याने काम केले. नोव्हेंबर २०१५ मध्ये दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटी सदस्य पदावर बढती व यासोबतच सब मिलिटरी कमिशन मेंबर व वेस्टर्न सबझोनल कमांडर इन चिफ म्हणून त्याने काम केले. ऑक्टोबर २०२० मध्ये दक्षिण गडचिरोली डिव्हीजन सचिव पदावर काम केले.
२०२१ मर्दीनटोला अभियान आणि उत्तर व दक्षिण गडचिरोली विभागाच्या विलीनीकरणानंतर त्याने विभागीय समितीचे प्रभारी व सचिव म्हणून काम केले. जिल्ह्यातील सीपीआय माओवाद्यांच्या संपूर्ण राजकीय व लष्कर हालचालींचा प्रभारी म्हणून तो काम करायचा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याचा पुनर्वसन बक्षीस योजनेचा धनादेश व संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, माजी खासदार अशोक नेते , पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.
सी- ६० जवानांचा सन्मान
जीवाची पर्वा न करता माओवादविरोधी अभियान राबवून शौर्य दाखविणाऱ्या अधिकारी व सी -६० जवानांचा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जवानांच्या धाडसामुळेच माओवाद्यांची हिंसक चळवळ उध्दवस्थ होत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या जवानांमुळे पोलिस प्रशासनाप्रती नागरिकांचा आदर वाढत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.