वडसा वनपरिक्षेत्रात आता बिबट्यांची दहशत; टी-२ वाघिणही सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 11:23 AM2022-11-02T11:23:43+5:302022-11-02T11:25:08+5:30
जंगलात जाणे टाळण्याचे वनविभागाचे नागरिकांना आवाहन
कोरेगाव (चोप)/ वैरागड : तब्बल १३ जणांचा बळी घेणाऱ्या सिटी-१ वाघाला पिंजऱ्यात बंद केल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडलेल्या नागरिकांच्या आणि वनविभागाच्या जिवाला पुन्हा घोर लागला आहे. वडसा आणि आरमोरी वनपरिक्षेत्रात टी-२ या वाघिणीचा वापर आहे. यासोबत एकट्या वडसा वनपरिक्षेत्रात तब्बल १० बिबट्यांचा वावर असल्यामुळे जंगलात जाणे धोक्याचे झाले आहे.
पट्टेदार वाघासह व बिबट्यांचा वावर वाढला असल्याने परिसरातील नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सिटी-१ वाघाची दहशत गेल्यावर्षी डिसेंबर २०२१ पासून गडचिरोली आणि वडसा वनविभागात पसरलेली होती. चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातही त्या वाघाने काही बळी घेतले. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आले. त्याला आता गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालयात ठेवले आहे.
सीटी-१ ला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण आता दुसऱ्या वाघाने सिटी-१ वाघाची जागा घेतली आहे. त्यात टी-२ ही वाघीण आहे.
वाघांना हल्ले करण्यासाठी पोषक वातावरण
जंगलात आता हिरवळ वाढल्याने लांबचे दिसत नाही. त्यामुळे झुडूप आणि गवतात लपून सावज टप्प्यात येताच हल्ला करणे वाघ, बिबट्यांसाठी सोपे झाले आहे. यामुळे जंगलात जाणाऱ्यांसाठी धोका वाढला आहे. अशा स्थितीत नागरिकांनी जंगलात जाऊ नये असे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले आहे. वडसा वनपरिक्षेत्रात, विशेषत: शिवराजपूर, उसेगाव, कोंढाळा, वडसा, एकलपूर या वनक्षेत्रात पट्टेदार वाघासह इतरही हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. परिसरात दुसऱ्या वाघाचे दर्शन झाले असून नागरिकांना सावध करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्र सहायक कीर्तीचंद्र कऱ्हाळे यांनी सांगितले.
बिबटे राहतात जोडीने
हल्ले करण्यात बिबटे वाघापेक्षाही जास्त तरबेज असतात. त्यांच्यात अधिक चपळाई असते. विशेष म्हणजे, ते बहुतांश वेळा जोडीने राहतात. वडसा वनपरिक्षेत्रात सध्या नर-मादी मिळून १० बिबटे आहेत. त्यांचा वावर डोंगरमेंढा, चोप, कसारी या परिसरात जास्त आहे.
आरमाेरी तालुक्यात ध्वनिक्षेपकावरून आवाहन
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोसरी बीट क्रमांक ३१७ मध्ये वाघाने दोन दिवसांपूर्वी एका गाईला ठार केले. देलनवाडी, सोनसरी बिटमध्ये वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. कोसरी येथील शेतकरी मंगरू निकुरे यांच्या मालकीची गुरे जंगलात चरायला गेली असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गाईला जागीच ठार केले.
देलनवाडी वनपरिक्षेत्राच्या वतीने देलनवाडी, मानापूर, कोसरी, मांगदा, उराडी, नागरवाही या गावात ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे आणि संतर्क राहण्याबद्दल आवाहन केले जात आहे. देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे, क्षेत्र सहायक एस.व्ही. नन्नावरे, बी.सी. मडावी, आर.पी. नन्नावरे, व्ही.व्ही. राऊत, के.टी.कुडमेथे हे जनजागृतीसाठी प्रयत्न करत आहेत.